1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

प्रिन्स- नाव सोनूबाई....

निर्माता : रेणु तौरानी, कुमार एस. तौरानी
दिग्दर्शक : कूकी वी गुलाटी
संगीत : सचिन गुप्ता
कलाकार : विवेक ओबेरॉय, अरुणा शील्ड्‍स, नंदना सेन, नीरू सिंह, संजय कपूर
यू/ए सर्टिफिकेट * 2 तास 15 मिनिट
रेटिंग : 1.5/5

'नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा' अशी 'प्रिन्स'ची परिस्थिती आहे. लेखकाच्या अतार्किक कल्पना आणि दिग्दर्शकाची बौद्धिक दिवाळखोरी आणि या दोघांना साजेशी कलावंताची कामगिरी यांची गोळाबेरीज म्हणजे 'प्रिन्स' हा सिनेमा आहे.

हॉलीवूड आणि बॉलीवूडचे चार दोन चित्रपट पाहून लेखक शिराज अहमद यांनी या चित्रपटाची कथा लिहिलीय. (खरे तर ढापलीय आणि चित्रपटात चिणलीय, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.) आता कथा काय आहे? तर प्रिन्स नावाच्या एका चोराच्या डोक्यातील मेमरी म्हणे पुसून टाकण्यात आली आहे. ती कुठल्याशा नाण्यात ठेवून ते कुठे तरी ठेवून दिले आहे. प्रिन्सलाही ते माहिती नाहीये. आता गुन्हेगारी जगतातील मंडळी त्याच्या मागे लागली आहेत. त्यांना ते नाणे हवे आहे. या प्रिन्सला प्रेयसीही आहे. पण स्मृती गेल्याने त्याचा फायदा उठवून तीन तीन प्रेयसी त्याच्या समोर येतात. स्वाभाविकच या प्रिन्ससमोर महत्त्वाची तीन कामे आहे. १. त्याची स्मृती सुरक्षित ज्या नाण्यात ठेवली आहे ते शोधणे. २. हे करताना येणारे अडथळे (उदा. गुंड मंडळी, पोलिस वगैरै ) लीलया दूर करणे आणि ३. तीन गर्लफ्रेंपैकी 'आपली' नेमकी कोण हे ओळखणे.

PR
लेखक आणि पटकथा लेखकाने त्याचा ही सगळी उद्दष्ट्ये पूर्ण करण्याचा मार्ग आखून दिला आहे. त्या मार्गाबरहुकूम चालून तो ही सगळी उद्दिष्ट्ये पार करतो. कुठेही काहीही वळणे नाहीत, पण जे काही घडते ते इतके अतार्किक आहे की काय चालले आहे तेच कळत नाही. मुदलात कथेतच कच्चे दुवे असतील, तर काय करणार आणि पटकथेतही ते झाकण्याचा प्रयत्न झालेला नाही. दिग्दर्शक कूकी गुलाटी यांनी तर ते अधिकच उघडे करून चित्रपटात दाखवले आहेत. चित्रपट स्टायलिश नि एक्शनबाज करण्याकडेच त्यांनी आपली उर्जा खर्च केली असल्याने कथाबिथा या भागाकडे त्यांना लक्ष द्यावेसे वाटले नसावे.

बाकी विवेक ओबेरॉय सिंगल हिरो असलेला सिनेमा पहायला किती लोक जातील देव जाणे. तेही जाऊ द्या. किमान अभिनयाच्या पातळीवर तर त्याने काही करून दाखवावे. पण आडातच नाही ते पोहर्‍यात कुठून येणार. बाकी अरूण शील्डस, नंदना सेन, नीरू सिंह या तीनही कन्यकांचा 'वावर'ही निराशाजनकच आहे. देहप्रदर्शनाव्यतिरिक्त काहीही काम नाही. बाकी सगळी मंडळी उगाचच लेदर जाकिट का घालतात ते काही कळत नाही. संगीतही फारसे खास नाही. एकच गाणे बरे आहे.

थोडक्यात, सुमार दर्जाच्या चित्रपटासाठी निर्माता तौरानींनी या चित्रपटावर एवढे पैसे का 'उडवले' असावेत हे काही कळत नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा