लंडन ड्रिम्स- सलमानसाठी पहाच!
IFM
IFMनिर्माता : आशिन शाह
दिग्दर्शक : विपुल शाह
गीत : प्रसून जोशी
संगीत : शंकर-अहसान-लॉय
कलाकार : सलमान खान, अजय देवगन, असिन, ओम पुरी, रणविजय सिंह, आदित्य रॉय कपूर, खालिद आज़मी
वॉंटेडमधला सलमान खानचा अभिनय तुम्हाला आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ट अभिनय आहे असे वाटत असेल तर थांबा. तुमने 'लंडन ड्रिम्स' देख्याच नहीं. लंडन ड्रिम्स पहा नि मग ठरवा सलमानचा तुम्हाला आवडलेला परफॉर्मन्स कोणता ते. आमच्या मते तरी सलमानचा सर्वोत्कृष्ट अभिनय याच फिल्ममध्ये पहायला मिळतो. 'हम दिल दे चुके सनम'मध्ये अजय देवगणने इंटरव्हलनंतर सलमानला खाल्ले असले तरी 'लंडन ड्रिम्स' मध्ये मात्र सलमाने त्याच्यावर मात केलीय.
लंडन ड्रिम्सच्या कथेत काही खास वेगळेपण नाही. मन्नू (सलमान खान) आणि अर्जुन (अजय देवगण) बालपणापासूनचे मित्र आहेत. दोघांचा स्वभाव मित्र भिन्न आहे. पण संगीताविषयी दोघांनाही प्रेम आहे. मन्नू आयुष्य चवीने जगणारा माणूस आहे. मुलींच्या मागे लागणे त्याला आवडते. पण तो तितकाच चांगला गायकही आहे. अर्जुनवर त्याचा खूप विश्वास आहे.
अर्जुन मात्र महत्त्वाकांक्षी आहे. तो संतापीही आहे. म्हणूनच देवावरही त्याचा फारसा विश्वास नाही. संगीत जगतात नाव कमावणे हे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी आहे.
IFM
IFMइकडे भारतात पंजाबात असलेला मन्नू कर्जाच्या बोज्याखाली अडकतो. कमाईसाठी तो गावच्या बॅंड पार्टीत सामील होते. एका दिवशी अर्जुन व मन्नूची भेट होते आणि अर्जुन त्याला लंडनला घेऊन जातो. पण नंतर त्याला कळते की मन्नूला लंडनला आणून त्याने मोठी चूक केली आहे.
मन्नू त्याच्यापेक्षा जास्त प्रतिभावंत आहे. त्यामुळे त्याला मोठे यश मिळते. जे यश मिळवायला अर्जुनला बरेच दिवस लागले, ते मन्नूला सहजगत्या मिळते. त्यातच प्रियाही मन्नूकडे आकर्षित होते. त्यामुळे तर अर्जुनची चीडचीड आणखी वाढते. त्यातच मन्नूला संपविण्याची योजना अर्जुन आखतो. पुढे काय होते ते पडद्यावर पहाण्यात मजा आहे. प्रेमाचा त्रिकोण म्हणजे या कथेत नाविन्य नाही. पण सादरीकरण दिग्दर्शक विपूल शहाने छान केले आहे.
विपुलने दोन्ही स्टारना तितकेच महत्त्व दिले आहे. इंटरव्हलपूर्वीचा सलमान 'मजाकिया' स्वरूपाचा विनोदी ढंगाचा आहे. तो त्याने मस्तच रंगवला आहे. इंटरव्हलनंतर मित्राच्या वर्तनाने दुखावला गेलेला सलमानही त्याने तितकाच ताकदीने उभा केला आहे. त्याचवेळी अजय देवगणही आपला प्रभाव पाडतो. ऑल दी बेस्टमध्ये विनोदी भूमिकेत असलेला अजय इथे मात्र गंभीर भूमिकेतही चपखल आहे. प्रेम ते द्वेष व्हाया असुरक्षितता हा प्रवास त्यानेही छान रंगवला आहे. असीनसाठी सुंदर दिसण्याव्यतिरिक्त फारसे काही काम नाही. तरीही तिची उपस्थिती प्रसन्न आहे.
एकुणात विपूल शहा दिग्दर्शित 'लंडन ड्रिम्स' पहायला काहीच हरकत नाही. किमान सलमानच्या अभिनयासाठी तरी.

