लक- नशीबाची ऐशीतैशी
IFM
दिग्दर्शक : सोहम शाह
संगीत : सलीम-सुलेमान
कलाकार : संजय दत्त, इमरान खान, श्रुती हसन, मिथुन चक्रवर्ती, डॅनी, रवी किशन, रती अग्निहोत्री, चित्रांशी
रेटिंग : 2/5
'लक' हा चित्रपट टिव्हीवरच्या 'बिग बॉस' सारख्या रियालिटी शोचे चित्रपटीकरण आहे. पण ते रियालिटी शोपेक्षाही भयंकर आहे. अशा रियालिटी शोमध्ये एक उद्दिष्ट समोर ठेवलेले असते. ते पूर्ण करायचे असते. ते पूर्ण न करणारे शोच्या बाहेर जातात. शेवटी जो उरतो, तो विजेता ठरतो. इथे मुसा (संजय दत्त) नावाचा खलनायक असा रियालिटी शो 'रियल आयुष्यात' ठेवतो. अट फक्त एकच असते. यामध्ये भाग घेणारे एकेक जण अपयशी ठरल्यानंतर थेट मृत्यूला कवटाळणार असतात. जो नशीबवान असतो, तोच वाचणार असतो.
हा मूसा म्हणजे नशीबाचा अर्थात 'लक'चा व्यापार करणारा असतो. त्यामुळे प्रत्येकाला तो मरणाच्या छायेत ठेवतो. त्यांची जगण्याची धडफड 'एंजॉय' करतो. जे चुका करतात, त्यांना मारतो. जे वाचतात ते पुढे जातात. मृत्यू त्यावेळी त्यांना चुकवून गेलेला असतो. त्याच्या या खेळात राम (इमरान खान), शॉर्टकट (चित्रांशी), मेजर (मिथून चक्रवर्ती), कैदी (रवी किशन) व नताशा (श्रुती हसन) हे सहभागी होतात.
कथा नक्कीच वेगळी आहे. पण तिचे सादरीकरण तितकेच वाईट आहे. मुळात पटकथाच बांधीव नसल्याने या कथेचे पुढे काय करायचे हा पटकथाकाराला आणि दिग्दर्शकाला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच अत्यंत ढिसाळपणे चित्रपट पुढे सरकत जातो. जीवन-मृत्यूचा हा खेळ थरारक करून तो लोकांना बांधून ठेवणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यात काहीच थरारक वाटत नाही. जबरदस्तीने कोंबलेले प्रसंग वाटतात.
क्लायमॅक्सही तितकाच निराशाजनक आहे. कशाचा कशाला ताळमेळ लागत नाही. दिग्दर्शक सोहमने चित्रपट स्टायलिश करण्याकडेच जास्त लक्ष दिले आहे. त्यात काही दृश्ये ठीक झाली आहेत. पण एकुणात मात्र निराशाच होते. मूसाच्या रोलमध्ये संजय दत्तने चांगले काम केले आहे. पण इमरानच्या चेहर्यावर संबंध चित्रपटभर एकच भाव वैताग आणतात. मिथून ठीक. रवी किशन व चित्रांशीचा अभिनय लक्षवेधी आहे. कमल हसनची कन्या श्रुतीने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट का निवडला असावा अशी शंका येते. कारण तिला यात काही वावच नाही. बिकीनी दृश्यातून आपण बिनधास्त दृश्ये देऊ शकतो, हे तिने दाखवले असले तरी त्याचा तिच्या अभिनयाशी काहीही संबंध नाही.
तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सशक्त आहे. स्टंट सीन चांगले आहेत. संगीत निराशाजनक आहे. पण एकुणात चित्रपट रंजक ठरलेला नाही.
