समीर कर्णिक या दिग्दर्शकाने यापूर्वी नन्हे जैसलमेर नावाचा छान चित्रपट केला होता. त्यानंतर आलेला 'हिरोज' फार काही खास नव्हता आणि आता आलेला 'वादा रहा' हाही निराशा करणाराच आहे.
ड्यूक चावला (बॉबी देओल) एक यशस्वी डॉक्टर आहे. पण आयुष्यात एक अपघात घडतो आणि त्याची प्रेयसी (कंगना राणावत) त्याला सोडून जाते. आधारही सुटून गेल्यानंतर बॉबी आत्मविश्वास गमावून बसतो. अशावेळी त्याच्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यासारखाच रूग्णाईत असलेला रोशन (द्विज यादव) त्याच्यात सकारात्मक दृष्टिकोण जागवतो. त्याच्या आधारानेच ड्यूक चाला-फिरायला लागतो.
IFM
IFM
वाचताना कथा छान वाटत असली तरी त्याचे पटकथेत तितके चांगले रूपांतर झालेले नाही आणि पडद्यावरही ती तितक्याच ताकदीने सादर केली गेलेली नाही. आयुष्य सोडून गेलेली कंगना नंतर मात्र परत बॉबीच्या आयुष्यात येते नि बॉबी तिला स्वीकारतोही. हे अनाकलनीय आहे. द्विज यादवच्या तोंडचे संवाद एखाद्या प्रौढ व्यक्तीचे वाटतात. लहान मुलगा बोलतोय असे वाटत नाही. संगीतही निराशाजनक आहे.
बॉबी देओल एवढी वर्षे इंडस्ट्रीत आहे, पण त्याच्याकडून आपण अभिनयाची अपेक्षा कधीच केली नव्हती. आपल्या या भावना कायम रहाव्यात त्याची काळजी त्याने याही चित्रपटात घेतली आहे. कंगनाला फारशी संधी नव्हतीच. द्विज यादव आणि मोहनीश बहल तेवढा लक्षात रहातो. बाकी 'वादा रहा- बोअर करनेका' असंच म्हणावं लागेल.