'सरकार राज' मध्ये बच्चन कुटुंबातील तीन सुपरस्टार असूनही चित्रपट दणकून आपटला आहे. रामगोपाल वर्माने या चित्रपटातून कमवून घेतले, वितरक मात्र तोट्यात गेले आहेत.
अमिताभ, अभिषेक व ऐश्वर्या या तिघांना एकत्र पाहण्यात लोक अजिबात उत्सुक नव्हते, हेच यातून सिद्ध झाले. चित्रपटाने सुरवातीचे तीन दिवस चांगला व्यवसाय केला. पण नंतर मान टाकली. महाराष्ट्रात हा चित्रपट चांगला चालला. कारण त्याची कथा या राज्याभोवतीच फिरते. रामगोपाल वर्माने या चित्रपटाचे हक्क चढ्या भावाने विकले होते. वितरकांनी यात मोठी गुंतवणूक केली होती. पण आता त्यांना तोटा सहन करावा लागणार हे स्पष्ट झाले आहे. देशभरात या चित्रपटाने साडेचौदा कोटींची व्यवसाय केला ाहे.
'सरकार राज'सोबत प्रदर्शित झालेल्या 'आमीर'चे समीक्षकांनी कौतुक केले असले तरी प्रेक्षक मात्र या सिनेमापासून दूरच राहिले. देशभरात हा चित्रपट अवघ्या ७२ लाखांचा व्यवसाय करू शकला. चित्रपट पडला तरी अभिनेता राजीव खंडेलवालला मात्र फायदा झाला आहे. त्याचा अभिनय चांगला असल्याने पुढील चित्रपटांमध्ये त्याला नक्कीच संधी मिळेल.
'हम से है जहॉं' नावाचा हा चित्रपटही या आठवड्यात रिलीज झाला होता. ही बातमी वाचतानाच कदाचित हे तुम्हाला कळले असेल. त्यामुळे त्याचे काय झाले हे सांगायची अजिबात गरज नाही. नुकताच प्रदर्शित झालेला 'मेरे बाप पहले आप' आणि 'समर २००७' या चित्रपटांची सुरवातही चांगली झालेली नाही. लोकांनी या दोन्ही चित्रपटांकडे पाठ फिरवल्याचे सिद्ध झाले आहे. 'जन्नत' ची लोकप्रियता आता घसरणीला लागली आहे.
आठवड्यातील टॉप पाच चित्रपट (६ ते १२ जून) सरकार राज (पहिला आठवडा) जन्नत (चौथा आठवडा) आमीर (पहिला आठवडा) भूतनाथ (पाचवा आठवडा) नार्निया- प्रिन्स कॅस्पियन (चौथा आठवडा)