निर्माता : इंद्र कुमार, अशोक ठाकरिया दिग्दर्शक : इंद्र कुमार संगीत : अदनान सामी कलाकार : संजय दत्त, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, आशिष चौधरी,
IFM
IFM
धमालची जातकुळी दोन महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'जर्नी बॉम्बे टू गोवा' चित्रपटाशी बरीचशी मिळतीजुळती आहे. बहुदा दोन्ही लेखकांचे प्रेरणास्त्रोत सारखेच असावेत! तीच एकेक नमुने एकत्र येऊन बनलेली टोळी, संपत्ती मिळवण्याची धडपड व मुंबईपासून गोव्यापर्यंतचा प्रवास. मात्र, धमाल त्या चित्रपटाच्या तुलनेत नक्कीच उजवा आहे. धमालचे दिग्दर्शक आहेत इंद्र कुमार.
या अगोदर त्यांनी बेटा, राजा, दिल, मस्तीसारखे हिट चित्रपट दिले आहेत. दिग्दर्शकांच्या रूपात इंद्रकुमार यांच्या काही मर्यादा आहेत. एकदम हटके भव्य-दिव्य चित्रपट बनविण्याचा ते कधी प्रयत्नही करत नाहीत. आपली बलस्थाने व कमकुवत बाजूंचे ज्ञान असलेले इंद्रकुमार सहकुटुंब पाहता येईल व चित्रपटगृहात आलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकास मनोरंजनात्कक सफर घडेल, ही दृष्टी समोर ठेवूनच चित्रपट निर्मिती करतात.
IFM
IFM
विनोदनिर्मितीसाठी ते छोट्या-छोट्या किस्स्यांची परिणामकारक गुंफण करतात. त्यांचे सूत्र म्हणजे पहा, हसा व विसरून जा ! धमाल ही कथा आहे चार मित्रांची. मानव (जावेद जाफरी), आदित्य (अर्शद वारसी) , रॉय (रितेश देशमुख) व बोमन (आशिष चौधरी). चारही नमुने. काही महामूर्ख तर काही अतिहुशार.
चौघाचेही लक्ष्य एकच काहीही क्लृत्या योजून श्रीमंत व्हायचे. पैसा कमावायचा. आदर्श, नीतिमत्ता असल्या संकल्पनांशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. योगायोगाने बोस (प्रेम चोप्रा) नावाचा गृहस्थ अनंताच्या प्रवासाला निघण्याअगोदर त्यांना गुप्तपणे साठवलेल्या करोडो रुपयांची माहिती देऊन जातो. कथानक अनपेक्षितपणे वळण घेत असल्याने उत्सुकता कायम राहते.
IFM
IFM
चौघांनाही आपण संपूर्ण संपत्तीचे मालक होऊन आयुष्य ऐषोरामात जाणार, अशी स्वप्ने पडत असताना अनपेक्षितपणे इन्सपेक्टर कबीरची (संजय दत्त) एंट्री होते. कबीर पुष्कळ दिवसांपासून बोसच्या मागावर असतो. संपत्तीचा मामला असल्याने चौघेच बोसच्या मृत्यूस जबाबदार असणार असा तो संशय व्यक्त करतो. संपत्तीवरून एकमेकांत मतभेद होऊन एकेकटेच खजिन्याच्या शोधार्थ निघतात. ह्या दृश्यांमधील धावपळ कमालीची परिणामकारक झाली आहे.
यामध्ये हास्यदृश्यांची गुंफण मनसोक्त हसवण्यासोबतच खुर्चीत बसवून ठेवते. सुरूवातीचा पंधरा मिनिटांचा भाग थोडा रटाळ झाला आहे. इंद्रकुमार भारतीय प्रेक्षकांचा बुद्ध्यांक 10-14 वर्षांच्या दरम्यान असल्याच्या समजुतीतून चित्रपट तयार करत असावेत. भारतीय प्रेक्षक सूज्ञ झाला आहे. त्याची चित्रपटाची जाण वाढण्यासोबतच दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून त्याच्यात परिपक्वता आली असल्याचे त्यांची गावीही नाही. त्यामुळे अनेकदा बाळबोध विनोद करतात.
एक आहे. चित्रपटातील हास्य-विनोदात कोठेही अश्लीलता येणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली आहे. कारण हल्ली असले चित्रपट बरेच येत आहेत. चित्रपटातील अभिनयाची बाजू भक्कम आहे. जावेद जाफरी, आशिष चौधरी, रितेश देशमुख व अर्शद वारसी यांनी प्रेक्षकांना हसविण्याची कामगिरी चोख पार पाडली आहे. रितेश व अर्शदची अभिनय क्षमता बघता त्यांची पात्रे आणखी खुलवता आली असती. संजयच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल.
असराणी यांनी खूप दिवसानंतर काम करून
IFM
IFM
आजही आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले आहे. वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात एकही नायिका नाही तिची कमतरताही भासत नाही. चित्रपटात फक्त दोन गाणी असून पटकथेतील त्यांची पेरणी योग्य आहे. कारण नसताना गाणे घुसडण्याचा अट्टहास केलेला नाही. तांत्रिक बाजू थोडी कमकुवत वाटते. छायाचित्रण व संपादन दोन्ही बाजू अगदी ढिसाळ वाटतात. संवादही पाहिजे तेवढी उंची गाठत नाही. पण तरीही धमाल एक टाईमपास चित्रपट आहे.