हॅरी आता पहिला उरला नाही
हरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फिनिक्स
दिग्दर्शक : डेव्हिड येटसपटकथा : मायकल गोल्डनबर्गकलाकार : डॅनियल रेडक्लिफ, एमा वॉटसन, रूपर्ट ग्रीट, इमेल्डा स्टॉनकल, मायकल गेम्बन, ग्रे ओल्डमॅन, हॅरी मेलिग, चो चॉंग हॅरी पॉटरच्या चित्रपट मालिकेतील पाचवा हरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फिनिक्स शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण हा चित्रपट या मालिकेतील इतर चित्रपटांच्या तुलनेत खूपच वेगळा आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपला 'हॅरी आता पहिला उरला नाही'. कारण लहानगा हरी आता बाल्यावस्था सोडून पौगंडावस्थेत आला आहे. त्यामुळे हा चित्रपट नेहमीच्या खेळकर शैलीतील न राहता गंभीर आहे. या मालिकेतील यापूर्वीचे चार चित्रपट पाहणार्यांना हा चित्रपट निराश करू शकतो. तांत्रिक करामती आणि जादू यांचाही अभाव असल्याने बच्चेकंपनीला हा हॅरी आपला न वाटण्याचीच शक्यता जास्त आहे. चित्रपटाची कहाणी नेहमीचीच आहे. दुष्ट शक्तींविरुद्ध सुष्ट शक्तींचा सामना आणि त्यात सुष्ट शक्तींनी मिळविलेला विजय. हॅरीला वॉल्डमार्टकडून आव्हान दिले जाते. एका कारस्थानांतर्गत हॅरीच्या हॉगवर्ड या जादुई शाळेत डोलोरस अम्ब्रिजला पाठविण्यात येते.
अम्ब्रिजची शिकविण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. ती जादू वगैरे बाजूला ठेवून मुलांना फक्त पुस्तके वाचण्यास सांगते. हॅरीसारख्या मुलांनी जादूपासून दूर राहावे अशी तिची योजना असते. पण हॅरीला ही गोम कळते. तो त्याच्या मित्रांना विश्वासात घेऊन याविरुद्ध काय करायचे ते समजावून सांगतो. हॅरीबरोबर शाळेचे मुख्याध्यापक डम्बलडोर, प्रा. मूडी आणि सायरस ब्लॅक असतात. अम्ब्रिज हॅरीला पायबंद घालण्याचा खूप प्रयत्न करते. पण शेवटी आपला हॅरीच जिंकतो. हे कथानक वाचल्यानंतर जे पहिल्यांदाच हॅरीचा चित्रपट पहायला जात असतील, वा त्याचे एकही पुस्तक वाचले नसेल तर त्यांना चित्रपट समजणे अत्यंत अवघड जाईल. कारण यातील कथानकाचे सूत्र मागील चित्रपटांच्या कथानकाशी जोडलेले आहे. मुख्य कथानकाला शाळेतील भ्रष्टाचार, या मुलांमधील समस्या अशी उपकथानके जोडली आहेत. मायकल गोल्डनबर्ग यांनी पटकथेत या सार्या बाबी अतिशय कौशल्याने गुंफल्या आहेत. सुरवातीची वीस मिनिटे चित्रपट अतिशय संथ आहे. त्यानंतर मात्र, घटना अशा वेगाने घडतात, की विचार करायलाही वेळ मिळत नाही. पुढे काय होणार याचीच उत्कंठा लागून राहते. हॅरीच्या मागील चित्रपटांप्रमाणे यात स्पेशल इफेक्ट्स आणि जादुई करामती पाहण्यासाठी जाणार्या प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट पाहून निराश व्हावे लागेल. कारण मुख्य पात्रांचीच वये वाढविल्यामुळे अशा गोष्टींना दिग्दर्शकाने फाटा दिला आहे. हॅरी आणि चो चॅंग (कॅटल लंग) यांच्यात तर एक चुंबनदृश्यसुद्धा आहे. त्यामुळे हॅरी आता यौवनाच्या उंबरठ्यावर आहे, हेही अधोरेखित होते. दिग्दर्शक डेव्हिड येटसने चित्रपट चांगला बनविला आहे, पण तो तयार करताना समोर लहान मुलांना ठेवलेले नाही. त्यामुळे नेहमीचा हॅरी येथे दिसत नाही. साहजिकच मुलांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सफाईदार आहे.
डॅनियल रॅडक्लिफ, एमा वॉटसन, रूपर्ट ग्रींट यांच्या अभिनयात आता परिपक्वता आली आहे. त्याच्या अन्य सहकार्यांनीही चांगला अभिनय केला आहे. मायकल गॅम्बन आणि ग्रे ओल्डमॅन यांच्याही भूमिका प्रभावशाली आहेत. पण या सर्वांत अम्ब्रिजची भूमिका वठविणार्या इमे़ल्डा स्टॉनटन यांनी खर्या अर्थाने अभिनयात बाजी मारली आहे. पडद्यावर आल्यानंतर काही क्षणातच तिच्याविषयी नकारात्मक भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते, यावरून त्यांच्या अभिनयाचा स्तर लक्षात येईल. एकूण सर्व बाजू पाहता, मुलांच्या दृष्टिकोनातून चित्रपट निराश करतो. या मालिकेतील गेल्या चार चित्रपटांच्या तुलनेत हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ फिनिक्स फिका वाटतो. थोडक्यात 'कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही'च्या चालीवर म्हणायचे झाल्यास 'आमचा हॅरी आता पहिला उरला नाही.'