२०१२ - पृथ्वीची एक्सपायरी डेट
PR
दिग्दर्शक : रोलैंड एमरिच
कलाकार : जॉन क्यूसैक, अमांडा पीट, डैनी ग्लोवर, वूडी हैरलसन
हे जग संपण्याच्या अनेक कथा, दंतकथा, अफवा, वदंता वारंवार येत असतात. भूतकाळात वर्तवलेल्या भविष्याच्या आधारेही पृथ्वीच्या आयुर्मानाचा अदमास काढण्याचा यत्न होतो. थोडक्यात, ही पृथ्वी नष्ट होईल, ही फॅंटसी सृजनात्मक मनाला आकर्षित करते. कारण त्यामागे असलेली भीतीची भावना त्याला या सृजनास पुरक वाटत असावी. याच थीमवर आधारीत २०१२ हा चित्रपट आला आहे.
माया संस्कृतीने ही पृथ्वी २०१२ रोजी संपणार असे भविष्य वर्तवले आहे. त्याआधारेच हा चित्रपट तयार केला आहे. ही पृथ्वी नष्ट होईल, तेव्हा होईल, परंतु ती कशी होईल, याची भयावह कल्पना या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ही सारी दृश्ये हादरवून टाकणारी आहेत.
सूर्याची उष्णता वाढत जाते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. त्याचा अभ्यास करणार्या एका भारतीय शास्त्रज्ञाला पृथ्वीचा अंत होणार असल्याचे जाणवते. तो ती बाब आपल्या अमेरिकन सहकार्याला सांगतो. ही बातमी नंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षापर्यंत पोहोचते. ते इतर राष्ट्रप्रमुखांना ही बाब सांगतात. लोकांपर्यंत मात्र ही बातमी पोहचू दिली जात नाही. कारण त्यामुळे उगाचच भयग्रस्तता दाटून येऊन गोंधळ होईल असे वाटते.
या महाप्रलयातून मानव जात वाचविण्यासाठी एक जहाज गुप्तपणे तयार करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यासाठी जगभरातून पैसे जमविले जातात. काही श्रीमंत मंडळी तर त्यात बसण्यासाठी सहाशे कोटी रूपये प्रति व्यक्ती इतके पैसेही द्यायला तयार होतात.
एकीकडे हे जग बुडीत निघत असताना दुसरीकडे राजकारणही सुरूच असते. एक विस्कटलेलं कुटुंब या आपत्तीच्या काळातच एक होते. या सिक्रेट शिपच्या माध्यमातून प्रलयातून वाचते.
या चित्रपटातून प्रेम, द्वेष, विश्वास-अविश्वास अशा मानवी पैलूंना प्रभावीपणे दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील नाट्यापेक्षा त्यातल्या स्पेशल इफेक्ट्सवर भर दिला आहे. सुरवातीच्या पंधरा मिनिटांनंतर आपत्तींचे तांडव सुरू होते, ते शेवटपर्यंत रहाते. ज्वालामुखी, भूकंप, सुनामीची दृश्ये प्रभावी आहेत.
इंडिपेंडन्स डे आणि द डे आफ्टर टुमारो असे चित्रपट बनविणार्या रोलॅंड एमरिच यांनी तसाच चित्रपट पुन्हा एकदा दिला आहे. अर्थात, मागच्या चित्रपटांच्या तुलनेत यात ते थोडे कमी पडल्याचे जाणवते. बाकी चित्रपट भव्यदिव्य आहे. जॉन क्युसॅक, अमांडा पीट, डॅनी ग्लोवर या सगळ्या कलावंतांचा अभिनय छान आहे.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा......
