शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्मोग्राफी
Written By
Last Updated : सोमवार, 15 मे 2023 (10:02 IST)

Happy Birthday ‘दयावान’ चित्रपटातल्या ‘त्या’ दृश्यावर माधुरीला झाला होता पश्चात्ताप

madhuri dixit
प्रदीप सरदाना
'ही माधुरी दीक्षित आहे, आमच्या अबोध पिक्चरची हिरोईन,'
आजपासून 39 वर्षांआधी राजश्री प्रॉडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांनी माधुरी दीक्षितशी माझा परिचय असा करून दिला होता. त्यावेळी त्यांच्या मुंबईतल्या प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो आणि समोर माधुरी दीक्षित बसली होती.
 
मी तिला पाहिलं तेव्हा ती थोडी लाजाळू वाटली मात्र थोड्याच वेळात ती हसली.
 
मी मनातल्या मनात विचार केला की राजश्रीने ही अशी कोण हिरोईन घेतली आहे. इतकी बारीक, तिचे गालसुद्धा खपाटीला गेले आहेत. एकूणच हिरोईनसारखं तिच्यात काहीच नव्हतं.
 
मात्र ही भेट झाल्याच्या पाच वर्षानंतर माधुरी दीक्षितने ‘दिल’चित्रपटाच्या माध्यमातून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. ती धकधक गर्ल झाली होती. माझा अंदाज खोटा ठरला होता.
 
माधुरीचा साधेपणा पाहता मला अजिबात असं वाटलं नाही की तिच्या अभिनयानेच नाही, तर तिच्या सौंदर्याने लाखो लोकांना घायाळ करेल. मात्र चिकाटी, मेहनत, नृत्य आणि प्रतिभेच्या बळावर तिचा प्रभाव दीर्घकाळ राहिला.
 
माधुरी दीक्षितचा प्रवास
माधुरीची जादू अजूनही तितकीच आहे. आज ती 56 वर्षांची झाली आहे. मात्र तिचे चाहते अजूनही तिच्या तितक्याच प्रेमात आहेत.
 
आज माधुरीचा वाढदिवस. या निमित्ताने तिच्या आयुष्याची सफर आज तुमच्यासमोर सादर करतो. आजही अनेक अभिनेत्रींच्या मांदियाळीत तिचं स्थान तिने अबाधित ठेवलं आहे.
 
आज माधुरी जवळ नवीन चित्रपट नाहीत. असं असलं तरी तिच्या माधुर्यात काहीही फरक पडलेला नाही.
 
माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967ला मुंबईत एका ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचे वडील शंकर दीक्षित इंजिनिअर होते. तिची आई स्नेहलता दीक्षित गृहिणी तर आहेच पण त्याबरोबर तिला नृत्य आणि संगीताची विशेष आवड आहे.
 
माधुरीला तीन भावंडं आहेत. रुपा, भारती आणि अजित. माधुरी सगळ्यात लहान आहे.
 
आई स्नेहलताने रुपा आणि भारतीला कथ्थक शिकवलं. जेव्हा माधुरी तीन वर्षांची झाली तेव्हा तिलाही कथ्थक शिकायला पाठवलं. 11 वर्षांच्या वयापर्यंत माधुरी कथ्थकमध्ये पारंगत झाली होती.
 
तिकडे शालेय शिक्षणासाठी अंधेरीत असलेल्या डिवाईन चाईल्ड स्कुलमध्ये तिने प्रवेश मिळवला. माधुरी लहानपणापासूनच अभ्यासू होती. त्याचबरोबर कथ्थक तिचं पॅशन झालं.
 
ती तिच्या बहिणीबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करत राहिली. माधुरी आठ वर्षांची असताना गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा तिचं नाव पेपरमध्ये आलं आणि तिचा उत्साह वाढला.
 
तिने पदवीचं शिक्षण पार्ले कॉलेजमधून घेतलं. मात्र चित्रपटांमुळे तिला ते अर्ध्यातच सोडावं लागलं.
 
लागोपाठ सात चित्रपट फ्लॉप
माधुरी जेव्हा 17 वर्षांची झाली तेव्हा तिची प्रतिभा दिग्दर्शक गोविंद मुनीस यांच्या नजरेस पडली. त्यांनी तिची भेट ताराचंद बडजात्या आणि त्यांचा मुलगा राजकुमार बडजात्या यांच्याशी घडवून आणली. काही वेळातच ती अबोध चित्रपटाची नायिका झाली होती.
 
हिरेन नाग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अबोध’ चित्रपटात माधुरीने गौरी नावाच्या युवतीची भूमिका केली होती. तिचा हिरो होता तापस पॉल.
 
राजश्री प्रॉडक्शन तेव्हापर्यंत ‘दोस्ती, जीवन मृत्यू, उपहार, गीत गाता चल, चितचोर, अंखियो के झरोखो से, दुल्हन वही जो पिया मन भाएं.' सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जायचा. मात्र 1980 च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट ओळीने फ्लॉप झाले होते.
 
‘अबोध’ चित्रपटाची तर इतकी वाईट अवस्था होती की हा चित्रपट देशभरात नीट प्रदर्शितही झाला नाही. त्यामुळे माधुरीला खूप दु:ख झालं. माधुरीला सुरुवातीच्या काळात मी विचारलं होतं की तुला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं का?
 
त्यावर तिने मनमोकळेपणाने उत्तर दिलं, “नाही नाही.. मला डॉक्टर व्हायचं होतं. मात्र गोविंद मुनीस काकांशी आमची चांगली ओळख होती. त्यांच्या सांगण्यावरून अबोध चित्रपटात काम केलं. त्याचवेळी एल व्ही प्रसाद यांच्या ‘स्वाती’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि माझा कल चित्रपटांकडे वळला.
 
‘अबोध’ नंतर माधुरीला ‘आवारा बाप’, ‘स्वाती’, ‘हिफाजत’, ‘उत्तर दक्षिण’, आणि ‘खतरो के खिलाडी’ सारखे चित्रपट मिळाले मात्र तिचे सात चित्रपट ओळीने फ्लॉप झाले.
 
यश आणि आत्मविश्वास
सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे माधुरी उद्धवस्त झाली. संघर्षाच्या दिवसांची आठवण करताना ती सांगते, “मी घरी येऊन खूप रडायची. मात्र माझ्या आई आणि बहिणींनी मला धीर दिला. आई म्हणायची, काळजी करू नको एक दिवस तुला नक्की यश मिळेल.”
 
आईची भविष्यवाणी खरी ठरली जेव्हा 1988 मध्ये तिचा ‘तेजाब’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. तिच्या नृत्याच्या प्रतिभेचं कौतुक झालं. माधुरीने ‘एक दो तीन....’ या गाण्यावर डान्स केला आणि मग तिने मागे वळून पाहिलंच नाही.
 
या चित्रपटातलं हे गीत आणि नृत्याची वेगळीच जादू होती. मला आजही ते दृश्य आठवतं. हे गाणं आलं की थिएटरमध्ये बसलेले लोक त्यांच्या जागेवरून उठून डान्स करायचे. काही प्रेक्षक नाचत स्क्रीनजवळ जायचे आणि नाणी, नोटा फडकावयचे.
 
या गाण्यामुळे ज्यांना हिंदी यायचं नाही त्यांनाही हिंदीत पाढे म्हणता यायला लागले. ‘तेजाब’ मुळे माधुरीचं नशीब पालटलं. या यशामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. पुढे जाऊन यश मिळेलच असा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला.
 
तेजाब आला त्याच वर्षी ‘दयावान’ आला. या चित्रपटात माधुरी दीक्षितने ‘आज फिर तुमपे प्यार आया है.’ या गाण्यावर अशी काही दृश्यं दिली की माधुरी एकदम चर्चेचा विषय झाली.
 
या दृश्यांसाठी तिच्यावर टीकाही झाली. त्यानंतर माधुरीलाही याचा पश्चाताप झाला. माधुरीने संपूर्ण करिअरमध्ये कधीही सीमा ओलांडली नाही. माधुरी अशा प्रकारच्या दृश्यांपासून लांब राहते.
 
माधुरीने त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी काबीज करण्यास सुरुवात केली. सुभाष घई यांनी माधुरीला ‘राम लखन’ चित्रपटात अशा भव्यतेने सादर केली जणू ती एक सुपरस्टारच झाली आहे.
 
‘राम लखन’ आला त्यावेळी दिल्लीतील सिरी फोर्ट येथे झालेल्या एका चित्रपट महोत्सवात ती आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली होती. ती सुभाष घई यांच्याबरोबर आली तेव्हा तिचं रुप पाहण्यासारखं होतं. तिचा अवतार आता ग्लॅमरस झाला होता.
 
माधुरीने तिच्या 39 वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये 70 चित्रपटात काम केलं आहे. त्यात ‘परिंदा’, ‘दिल’, ‘जमाई राजा’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘हम आपके है कौन’, ‘याराना’, ‘अंजाम’, ‘दिल तो पागल है’, ‘पुकार’, ‘देवदास’ यासारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.
 
तिला सहावेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 17 वेळा तिला फिल्मफेअरचं नामांकन मिळालं आहे. अनेक मोठ्या अभिनेत्रींना तिने मागे टाकलं आहे. 2008 मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलंं.
 
लग्न, संन्यास आणि पुनरागमन
हे सगळं सुरू असतानाच तिच्या आयुष्याने एक नवीन वळण घेतलं. 17 ऑक्टोबर 1999 ला तिने तिच्या भावाच्या घरी भारतीय वंशाचे डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
 
यशाच्या शिखरावर असताना माधुरी असं अचानक लग्न करेल असं कोणाला वाटलं नव्हतं. तेही अशा व्यक्तीशी जो बिझनेस, क्रिकेट अशा कोणत्याच क्षेत्रातला नाही. खरंतर अभिनय क्षेत्रातल्या मुली अशाच क्षेत्रातल्या व्यक्तीशी लग्न करतात.
 
माधुरीने काही दिवसांतच तिच्या लग्नाचा स्वागत समारंभ मुंबईत ठेवला होता. त्यात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, सायराबानो, श्रीदेवी, बोनी कपूर यांच्यासह अनेक जणांनी हजेरी लावली.
 
जेव्हा माधुरीने लग्न केलं तेव्हा ती 32 वर्षांची होती. लग्नानंतर तिने अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं, चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेतला आणि ती अमेरिकेत निघून गेली.
 
17 मार्च 2003 ला तिने तिच्या पहिल्या मुलाला रियानला जन्म दिला. त्यानंतर 8 मार्च 2005 ला एरिन नावाच्या दुसऱ्या मुलाचाही जन्म झाला.
 
लग्नानंतर सात वर्षानंतर संन्यास त्यागून पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्यासाठी ती भारतात परतली.
 
मात्र जेव्हा अरिनला कडेवर घेऊन मुंबई एअरपोर्टाच्या बाहेर आली तेव्हा तिला कोणी ओळखलं नाही. ती अगदी साधासा सलवार सूट घालून विना मेकअपची होती. मात्र काही वेळात लोकांनी तिला ओळखलं आणि तिला तिच्या कारपर्यंत जाणंही कठीण झालं.
 
त्यानंतर लगेचच आलेला तिचा ‘आजा नचले’ सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर काही काळ ती चित्रपट क्षेत्रापासून दूर झाली. पुढे 2010 मध्ये ‘झलक दिखला जा’ या शो ची जज म्हणून काही काळ ती पुन्हा भारतात आली.
 
माधुरी दीक्षितचा अभिनय, नृत्य, हास्य, सौंदर्य पाहिलं तर ती मधुबालासारखी दिसते. नर्तिका म्हणून सुद्धा ती वैजयंतीमाला आणि हेमामालिनीच्या तोडीची आहे.
 
आधी अभिनेत्री मीना कुमारी, मधुबाला, नर्गिस यांच्यासारख्या होण्याची इच्छा ठेवायच्या. आता अनेक अभिनेत्री म्हणतात की त्यांना माधुरी दीक्षित सारखं व्हायचं आहे.
 
ऑक्टोबर 2011 मध्ये ती अमेरिका सोडून कुटुंबाबरोबर मुंबईला आली.
 
त्यांनी वरळीमध्ये एक घर घेतलं आहे. तिच्याकडे सध्या चित्रपट नाहीत मात्र त्याची चिंता तिला नाहीच.
 
कलर्स वाहिनीवनर ‘डान्स दिवाने’ ची जज होऊन तिने तिची उपस्थिती नोंदवली. तसंच नेटफ्लिक्सच्या द फेम गेम या सीरिजमध्येही तिने काम केलं.
 
स्वत:चे चित्रपट तयार करण्यावरही तिचा भर आहे. 2019 मध्ये निर्माता म्हणून ‘15 ऑगस्ट’ हा चित्रपट 2019 मध्ये आला होता. काही पटकथांवरही ती काम करत आहे.
Published By -Smita Joshi