1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन

देशभक्तीपर चित्रपट

वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला बटबटीत आणि ओंगळवाणे स्वरूपही दिले. पण तरीही या विषयाची मांडणी प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा आढावा.

गेल्या काही दिवसात शहीद भगतसिंग यांच्यावरील चित्रपट अचानक वाढले. 1948 मध्ये दिलीपकुमार यांचा शहिद चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहून त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना सल्ला दिला होता. बेटा, यापुढे ज्यात तू मेलेला दाखवशील असे रोल करू नकोस.

त्यानंतर 1963 मध्ये शम्मीकपूर हेही भगतसिंग यांच्या रूपात पडद्यावर आले होते. पण जंगली शम्मीचे हे शहिद रूप प्रेक्षकांना मात्र फारसे आवडले नाही. 2002 मध्ये तर चार भगतसिंग एकमेकांसमोर ठाकले होते. प्रेक्षकांनी तिघांवर फुली मारली. राजकुमार संतोषी यांचा भगतसिंग पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली.


अमिताभचा देशप्रेमीही लोकांना आठवत असेलच. याशिवाय अनेकांनी भारत, देशभक्ती वगैरे दाखवायचा प्रयत्न केला. पण बटबटीत आणि सवंगपणा त्यातून जास्त दिसला.

युद्धपट तर अनेक निघाले. त्यात नाव घेण्यासारखे खूप कमी आहेत. त्यात छोटा चेतन, हकिकत असे काही उल्लेखनीय आहेत. अलीकडच्या काळात जे. पी. दत्ता यांनाही देशभक्तीचा फिवर चढला होता. त्यांचा बॉर्डर चांगला बनला आणि गाजलादेखील भरपूर. पण एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) च्या बाबतीत लोकांनी एवढा कंट्रोल पाळला की ते थेटरात गेलेच नाहीत. बाकी हिंदूस्थान की कसम सारखे सुमार चित्रपटही बरेच आले. त्यांची दखल न घेतलेलीच बरी.

केतन मेहना यांनी 1857 च्या क्रांतीचे बिगूल वाजवून आमिर खानला मंगल पांडे म्हणून सादर केला. चित्रपट बऱ्यापैकी गाजला. यातील मंगलगानही चांगलेच गाजले. आणि चर्चा जास्त झाली ती आमीर खानच्या मंगल पांडेतील नव्या केशभूषेची आणि मिशीची. कोणाचे काय तर कोणाचे काय.


आशुतोष गोवारीकरने देशभक्तीला नवे परिणाम दिले. क्रिकेटचे. त्यामाध्यमातून देशभक्ती कशी व्यक्त करता येते, याचे कथानक अतिशय छान गुंफून तसेच मांडले. नुकताच आलेल्या चक दे इंडियामधून हॉकी या राष्ट्रीय खेळाला मांडताना त्यालाही राष्ट्रभक्तीची किनार दिली आहे. एकूण काय देशभक्ती आता सर्वस्पर्शी झाली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा