1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

...तर ओसामा दहशतवादी झालाच नसता!

कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भावाचा मृत्यू विमान अपघातात झाला नसता तर ओसामा कधीही दहशतवादी झाला नसता. वाचून आश्चर्य वाटलं असेल. पण हे मत कुणी ऐर्‍यागैर्‍याने मांडलेले नाही. अतिशय प्रतिष्ठेचे समजल्या जाणार्‍या पुलित्झर पारितोषिकाचे विजेते लेखक स्टीव्ह कोल यांच्या नव्या पुस्तकात हे मत मांडण्यात आले आहे.

हे पुस्तक लादेन कुटुंबीयांवर आधारीत असून त्याचे नाव 'द बिन लादेन्स' असे आहे. या पुस्तकासंदर्भात रॉयटरला दिलेल्या एका मुलाखतीत कोल यांनी सांगितले, की हे पुस्तक लादेन कुटुंबियांना समजून घेण्याचा आणि एक शिक्षित माणूस इस्लामी जिदाहच्या रस्त्यावर कशी काय वाटचाल करू लागतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.

ओसामाच्या वडिलांचा मृत्यू १९६७ मध्ये झाला. त्यावेळी ओसामा फक्त ९ वर्षांचा होता. मग त्याचा सावत्र भाऊ सलेम यानेच त्याचा सांभाळ केला. सलेमने व्यावसायाचा सर्व कारभारही हाती घेतला. सौदी अरेबियाच्या शाही घराण्याची सलेमचे जवळचे संबंध होते. त्यातूनच त्याला अनेक इमारतींच्या बांधकामाचे ठेके मिळाले आणि त्यामुळे लादेन कुटुंबीय प्रचंड श्रीमंत झाले.

ओसामाही त्यावेळी घरच्या व्यवसायात लक्ष घालत होता. पण त्याचवेळी त्याचे धार्मिक शिक्षणही चालू होते. पण पुढे १९८८ मध्ये ओसामाच्या भावाचा एका विमान अपघातात मृत्यू झाला आणि ओसामा पूर्णपणे कोसळून गेला. त्याच काळात त्याची मैत्री अयमान अल झवाहिरी व इत र इस्लामी विद्वानांशी झाली.

त्याचवेळी त्याचे लक्ष व्यवसायाऐवजी इतर गोष्टींकडे वळाले. येमेनच्या इस्लामी बंडखोरांना तो मदत करू लागला. याच काळात इराकने कुवेतवर हल्ला चढविला. कुवेतच्या बचावासाठी अमेरिकी फौजा सौदी अरेबियात गेल्या. त्यावेळीच ओसामाने आपले आयुष्य इस्लामी जिहादसाठी घालवायचे हे निश्चित केले. त्याने आपल्या संपत्तीतील मोठा वाटा अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनविरूद्ध लढणार्‍या मुजाहिदीनांनाही दिला होता.

कोल यांनी ओसामाच्या अनेक मित्रांची भेट घेतली होती. त्यांनीही हेच सांगितले, की सलेम जिवंत असता तर ओसामा दहशतवादी झाला नसता. आपल्या ५३ भावा-बहिणींत तो सलेमला अतिशय मानायचा.