गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (10:35 IST)

रशिया आणि युक्रेनमधल्या दुष्मनीची 5 कारणं...

bladimir putin
- जान्हवी मुळे
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारी 2022 ला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली. गेल्या एक वर्षात दोन्ही बाजूंचे हजारो लोक या युद्धात मारले गेले आहेत.
 
युक्रेन आणि रशियाचं मोठं नुकसानही झालं आहे. पण, अजूनही हे युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये.
 
पण पुतिन यांना युक्रेनविषयी एवढा आकस का वाटतो? रशिया आपल्या या शेजारी देशाच्या एवढा मागे का लागला आहे?
 
याचं उत्तर या दोन्ही देशांच्या इतिहास, भूगोल आणि भाषेमध्ये दडलं आहे.
 
1. युक्रेन-रशियाचा सांस्कृतिक इतिहास
या सगळ्याची सुरुवात 9 व्या शतकापासून होते, जेव्हा पूर्व युरोपात स्लाविक वंशाच्या टोळ्यांचा देश, किवान रुस अस्तित्वात आला. आजच्या युक्रेन, रशिया आणि बेलारूस या देशांचा जन्म झाला याच किवान रुसमधून झाला असं या प्रदेशातले लोक मानतात.
 
दहाव्या शतकात किवान रूसचा राज्यकर्ता होता प्रिन्स वोलोदिमीर, जो प्रिन्स व्लादिमीर द ग्रेट म्हणूनही ओळखला जातो.
 
याच व्लादिमीरनं ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्माचा स्वीकार आणि प्रसारही केला. त्यामुळे रशिया तसंच युक्रेनसह अनेक देशांत तो संत व्लादिमीर म्हणूनही ओळखला जातो.
 
म्हणजे धर्म आणि वंशाच्या दृष्टीनं दोन्ही देशांचा उगम एकाच परिसरातून झाला आहे. जवळपास चार शतकं या किवान रूसचा अंमल कायम होतात.
 
पण किवान रूसच्या पाडावानंतर हे नातं तुटलं. पूर्व युरोपात वेगवेगळ्या प्रादेशिक सत्ता निर्माण झाल्या. कधी मंगोल साम्राज्य, पोलंड अशा बाहेरच्या सत्तांचा अंमल या प्रदेशावर होता. मग सतराव्या आणि अठराव्या शतकात युक्रेन पुन्हा रशियन साम्राज्याचा भाग बनला.
 
2. सोव्हिएत कालखंडातील युक्रेन
1917 साली रशियन राज्यक्रांतीनंतर तिथली राजेशाही संपुष्टात आली. मग 1922 मध्ये कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी विचारसरणीच्या सोव्हिएत युनियनचा उदय झाला. त्यावेळी युक्रेन या सोव्हिएत संघराज्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता.
 
तब्बल 69 वर्ष युक्रेन आणि रशिया हे दोन देश सोव्हिएत संघराज्याचा भाग म्हणून एकत्र राहिले. म्हणजे सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्यातल्या शीतयुद्धाच्या काळात युक्रेन अमेरिकेच्या विरोधात होता.
 
पण म्हणजे दोन देशांमध्ये सारं काही आलबेल होतं असं मात्र नाही. 1932-33 मध्ये युक्रेनमध्ये मोठा दुष्काळ पडला होता, ज्यात लाखो लोकांचा मृत्यूही झाला. होलोडोमोर नावानं ओळखला जाणारा तो दुष्काळ मानवनिर्मित होता आणि त्यासाठी सोव्हिएत युनियनची धोरणं जबाबदार होती असं आजही अनेक युक्रेनियन मानतात.
 
ही नाराजी वाढत गेली. सोव्हिएत देशांमधली गरिबी, शीतयुद्धाचे दुष्परिणाम, साम्यवाद मागे पडून नव्या विचारांचा उदय, सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी आणलेले बदल अशा गोष्टींमुळे अखेर 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचं 15 देशांमध्ये विघटन झालं. युक्रेननं स्वातंत्र्य जाहीर केलं.
 
या गोष्टीची सल व्लादिमीर पुतिन यांच्यासारख्या काही रशियनांच्या मनात तीस वर्षांनंतरही कायम आहे. पुतिन यांच्या भाषणातही ती दिसून येते.
 
3. युक्रेनचं भौगोलिक आणि सामरिक महत्त्व
युक्रेनची राजधानी कीव्ह आणि रशियाची राजधानी मॉस्कोमधलं अंतर जेमतेम 700-800 किलोमीटरचं आहे. म्हणजे साधारण मुंबईहून नागपूरएवढंच.
 
साहजिकच युक्रेन सामरिकदृष्ट्या कायमच रशियासाठी अतिशय महत्त्वाचा राहिला आहे. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचा मोठा अण्वस्त्रसाठाही युक्रेनमध्येच ठेवलेला होता.
 
काळा समुद्र आणि भूमध्य सागरातील आपल्या व्यापारी मार्गांचा विचार करता युक्रेन आपल्या बाजूनं असणं ही रशियासाठी कायमच एक प्राथमिकता राहिली आहे.
 
सोव्हिएत पाडावानंतर रशिया युक्रेनकडे पूर्व युरोपातील देशांना जोडणारा मुख्य दुवा आणि पाश्चिमात्य देशांना दूर ठेवणारा 'बफर झोन' म्हणून पाहात आला आहे.
 
या बफर झोनमध्ये नाटो फौजा आल्या तर ते रशियाला दिलेलं थेट आव्हान समजू आणि योग्य उत्तर देऊ असा पवित्रा पुतिन यांनी घेतला आहे. युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवणंही त्यांना मान्य नाही.
 
इथे हे लक्षात घ्यायला हवं, की युरोप खंडाचा भाग असला, तरी युक्रेन युरोपियन युनियनचा सदस्य नाही. हा देश नाटो राष्ट्रगटांतही नाही.
 
मात्र गेल्या काही दशकभरात कीव्हमध्ये युरोपवादी विचारांचा प्रभाव वाढत गेला आहे. त्यामुळे रशियावादी आणि युरोपवादी असे दोन गट देशात पडले.
 
4. भाषिक समीकरणं
काहींच्या मते युक्रेनमध्ये ही विभागणी आधीपासूनच होती. कारण एक देश असला, तरी युक्रेन भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध नाही.
 
युक्रेनच्या पश्चिम आणि मध्य भागात युक्रेनियन भाषा बोलली जाते. तर दक्षिण आणि पूर्व भागातील प्रांतांमध्ये प्रामुख्यानं मातृभाषा रशियन असलेले लोक राहतात.
 
भाषेशी निगडीत असलेली हीच ओळख 2014 साली संघर्षाचं कारण ठरली. त्यावेळी कीव्हच्या मैदान चौकात निदर्शनं आणि त्यातून सत्तांतर झालं, आणि राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांनी देश सोडून रशियात आश्रय घेतला होता. त्यानंतर युक्रेनमध्ये युरोपवादी सत्तेत आले आणि मग रशियन भाषिक क्रायमिया द्वीपकल्पानं फुटून रशियात जाण्याचा निर्णय घेतला.
 
5. पुतिन यांची महत्त्वाकांक्षा
लेखक आणि पत्रकार ऑलिव्हर बुलो लिहितात, की "रशियाला पुन्हा प्रभावशाली बनवण्याचा आपला उद्देश पुतिन यांनी कधीच लपवून ठेवलेला नाही. पंतप्रधानपदावर असताना आपल्या पहिल्या भाषणातही त्यांनी देशाला नवा आकार देण्याचा उल्लेख केला होता. "
 
सगळ्या रशियन लोकांना पुन्हा एकत्र आणणारा नेता अशी ओळख निर्माण करण्यासाठी पुतिन उत्सुक आहेत आणि म्हणूनच युक्रेन परत मिळवायच्या विचारानं पुतिन यांना जणू पछाडलं आहे असं निरीक्षण रशियाविषयीच्या अनेक जाणकारांनी नोंदवलं आहे.
 
त्यातूनच पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या जॉर्जियावर पुतिन यांनी 2008 साली हल्ला केला होता. जॉर्जियातले साऊथ ओसेटिया आणि अबखाझिया हे भाग तेव्हापासून रशियाच्या नियंत्रणाखाली आहेत.
 
युक्रेनविषयीही पुतिन यांची मतं आणखी तीव्र आहेत आणि त्यांनी ती अनेकदा स्पष्टपणे मांडली आहेत. युक्रेनमधल्या रशियन भाषिकांचं ते वेळोवेळी समर्थन करत आले आहेत. त्यामुळेच त्यांनी क्रायमियाचं रशियात विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता.
 
आता सात वर्षांनी पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. पुतिन यांनी दोनेस्क आणि लुहान्स्का या युक्रेनमधल्या फुटिरतावादी प्रदेशांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. नाटो फौजा युक्रेनच्या आणि पर्यायानं रशियाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत.