शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (20:05 IST)

फक्त 4 वर्षांच्या चिमुकल्याने प्रसंगावधान राखून बोलवली अॅम्बुलन्स, वाचवले आईचे प्राण

चार वर्षांच्या मुलाने प्रसंगावधान राखत मेडिकल इमरजन्सीला फोन करून अॅम्बुलन्स मागवली आणि आपल्या आईचे प्राण वाचवले. कौतुकास्पद बाब ही की या प्रसंगाच्या एकच दिवस आधी त्याच्या आईने त्याला इमरजन्सी कॉल कसे करायचे हे शिकवले होतं. ऑस्ट्रेलियातील लॉंसिस्टोन शहरात राहणाऱ्या मॉंटी कॉकर नावाच्या या चिमुकल्याने इमजरन्सी नंबर डायल केला आणि त्यांना सांगितलं 'माझी आई पडली.' जेव्हा बचाव पथकाला सर्व गोष्टी कळल्या त्यांनी त्यांच्या घरी तातडीने धाव घेतली.
 
"जसा आम्हाला त्यांचा पत्ता मिळाला आम्ही त्या ठिकाणी पोहोचले, त्या घराच्या खिडकीत हा चिमुरडा उभा होता आणि आम्हाला हात दाखवत होता," असं बचाव पथकातील अधिकारी मार्क स्मॉल यांनी बीबीसीला सांगितलं.
 
घरात गेल्यावर देखील मॉंटीने एखाद्या वयस्कर व्यक्तीप्रमाणे शांतपणे बचाव पथकाला आई कुठे आहे ते दाखवले.
मॉंटीची आई वेंडी या फीट येऊन पडल्या होत्या.
 
स्मॉल म्हणाले, की "मॉंटीने उचललेल्या या पावलामुळे वेंडी या धोक्याबाहेर गेल्या. जेव्हा तुम्ही डोक्यावर कोसळता किंवा फीट येऊन बराच वेळ झाला असेल अशा वेळी धोका अधिक वाढतो."
 
पुन्हा घेतली मॉंटीची भेट
बचाव पथकाची टीम पुन्हा माँटीच्या घरी दोन दिवसांनी गेली. पण यावेळी कुणाला अत्यवस्थ वाटत आहे म्हणून नाही तर मॉंटीला त्यांनी एक प्रशस्तिपत्रक दिलं.
 
मॉंटीची आई वेंडी या नर्स आहेत. त्यांनी सांगितलं की मॉंटीला हे माहीत आहे की त्याने महत्त्वाचं आणि चांगलं काम केलंय, पण तो त्याच्या मित्रांना मात्र सांगताना हेच सांगतो की हे खूपच सोपं होतं.
 
"त्याची आजी आली, आणि तिने आम्हाला विचारलं की आपला सुपरहिरो कुठे आहे, तर हा म्हणतो नाही, नाही मी काही सुपरहिरो नाही. मी फक्त हिरो आहे," अशी गंमत मॉंटीच्या आईने सांगितलं.
 
ही घटना होण्याच्या एक दिवस आधीच मॉंटीच्या आईने त्याला फोन अनलॉक कसा करायचा आणि इमरजन्सीला फोन लावून अॅम्बुलन्स कशी बोलवायची हे दाखवलं होतं.
 
वेंडी सांगतात की जेव्हा त्यांना बरं वाटेनासं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या पतीला फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या पुढचं त्यांना काही आठवत नाही.
 
मॉंटीचे वडील जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी अॅम्बुलन्स दिसली. त्यानंतर त्यांना सर्व परिस्थिती लक्षात आली. मॉंटीचे वडील म्हणतात की आम्हाला मॉंटीचा खूप अभिमान आहे. त्याच्यामुळे आमच्यावरील अनिष्ट टळलं.
 
स्मॉल सांगतात की मी बचाव पथकात गेल्या 13 वर्षांपासून काम करतोय. अनेक वेळा वयाने मोठी मुलं अॅम्बुलन्स बोलवतात हे मी पाहिलं आहे पण एका चार वर्षांच्या चिमुकल्याने अॅम्बुलन्स बोलवणं हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय.