शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (18:45 IST)

Attack on Yoga Day : मालदीवमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमावर जमावाचा हल्ला

जगभरात आज जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला जात आहे, मात्र मालदीवमधून एक अप्रिय बातमी समोर आली आहे. मालदीव सरकार आणि भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमादरम्यान संतप्त जमावाने हल्ला केला. 
 
राजधानी माले येथील राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये आज सकाळी हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जमावाने तेथे हल्ला केला. हल्लेखोरांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. सकाळी स्टेडियममध्ये उपस्थित लोक योगा करत असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.
 
हातात झेंडे घेऊन आलेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मालदीवच्या युवा, क्रीडा आणि सामुदायिक सक्षमीकरण मंत्रालयाने मंगळवारी भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने योग आणि ध्यान सत्राचे आयोजन केले. या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोर योगाभ्यास करणाऱ्यांवर हल्ला करत असून पोलीस हस्तक्षेप करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
मालदीवचेअध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करताना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, या घटनेमुळे आमचे सरकार खूप चिंतेत आहे. ते म्हणाले की, गलोल्हू स्टेडियमवर आज सकाळी घडलेल्या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोषींना लवकरच कायदेशीर शिक्षा देण्यात येईल.