गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (08:18 IST)

आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सभेदरम्यान ट्रम्प समर्थकाने दिली प्राणांची आहुती

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा शनिवारी ( 14 जुलै) एका सभेदरम्यान प्रयत्न झाला. या घटनेमुळे संपूर्ण जग हादरले आहे. या घटनेवेळी ट्रम्प यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळीने एका जणाचा मृत्यू झाला.
 
आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी या व्यक्तीने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी दिलेल्या बलिदानाची चर्चा होत आहे.
 
पेन्सिल्वेनियातील बटलर शहरात ट्रम्प यांच्या प्रचारसभेळी गोळीबार सुरू झाल्यानंतर स्वतःच्या कुटुंबासमोर ढाल बनून उभ्या राहिलेल्या 50 वर्षांच्या कोरी कॉम्परेटर यांचा या गोळीबारात मृत्यू झाला.
 
कोरी हे अग्निशमन स्वयंसेवक दलाचे प्रमुख होते. जेव्हा हा गोळीबार सुरू झाला तेव्हा त्यांनी आपल्या छातीचा कोट करुन आपल्या कुटुंबीयांचे रक्षण केले.
पेन्सिल्वेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, "कोरी यांना एखाद्या नायकासारखा मृत्यू मिळाला."
 
पेन्सिल्वेनियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आणखी दोन व्यक्ती जखमी झाले. जखमींमध्ये 57 वर्षांचे डेव्हिड डच आणि 74 वर्षीय जेम्स कोपनहेव्हर यांचा समावेश आहे. रविवारी दोघांचीही प्रकृती स्थिर होती.
 
पेन्सिल्वेनियाचेचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी सांगितलं की या हल्ल्यात मृत पावलेल्या कोरी कोम्परेटर यांच्या पत्नी आणि मुलींशी त्यांनी संवाद साधला आहे.
शापिरो यांनी सांगितलं की, कोरी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक होते आणि शनिवारी झालेल्या सभेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
 
जोश शापिरो म्हणाले की, "कोरी आमच्यापैकी सर्वोत्तम होते, त्यांच्या आठवणी सदैव राहतील. ती रात्र धक्कादायक होती, राजकीय मतभेदांना हिंसेने कदापि उत्तर दिलं जाऊ शकत नाही."
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरी कॉम्पेरेटर हे पेपेन्सिल्वेनियामधील पिट्सबर्ग शहराच्या बाहेर असणाऱ्या सारव्हरमध्ये राहत होते. ज्या बटलर शहरात ही सभा होती तिथून कोरी यांचं गाव 19 किलोमीटर अंतरावर आहे.
 
कोरी एक स्वयंसेवक म्हणून अग्निशमन दलात काम करत होते. तसेच त्यांच्या सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार ते एका प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये प्रकल्प आणि टुलिंग अभियंता म्हणूनही कार्यरत होते.
कोरी यांच्या शेजारी राहणाऱ्या मॅट अकिलीस यांनी पिट्सबर्ग ट्रिब्यून-रिव्ह्यूला सांगितलं की, "ते माणूस म्हणून खूप चांगले होते. आमचे राजकीय विचार जरी एक नसले तरी यामुळे आमच्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला नाही. ते एक चांगले मित्र होते आणि चांगले शेजारी देखील."
 
अकिलीस म्हणाले की, "मी दवाखान्यात होतो तेव्हा त्यांनी आम्हाला पैसे दान केले होते, तसेच ते नेहमी आमच्या 'यार्ड सेल'(घरातील जुन्या सामानाची विक्री) ला भेट द्यायचे. मी त्यांच्या घराजवळून जायचो तेव्हा ते नेहमी मला 'हॅलो' करायचे."
 
गव्हर्नर शापिरो म्हणाले की, जखमींपैकी एकाच्या कुटुंबाशी त्यांचं बोलणं झालं आहे पण या संभाषणात नेमकं काय झालं ते मात्र त्यांनी सांगितलं नाही.
 
या सभेत झाडलेल्या सहा ते आठ गोळ्यांपैकी एका गोळीने ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली.
 
अधिकारी आणि प्रशासनाने वीस वर्षीय हल्लेखोराची ओळख पटवली असून त्याचं नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स असं आहे.
 
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी त्याला तिथेच ठार केले.
 
Published By- Priya Dixit