1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चित्ता वेगात नामशेष होण्याच्या मार्गावर!

स्वित्झलँड- ताशी सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने धावणारा, सर्वांत वेगवान आणि चपळ प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता नामशेष होण्याच्या मार्गावर असून संपूर्ण जगामध्ये आता केवळ 7100 चित्ते उरले असल्याचे एका नव्या संशोधनात समोर आले आहे.
 
सध्या असुरक्षित म्हणून गणल्या जाणार्‍या चित्याचे वर्गीकरण धोक्यात असलेला, चिंताजनक असे करणे आवश्यक आहे. चित्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या वतीने धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी तयार करण्यात येते. त्यामध्ये चित्ता सध्या असुरक्षित या वर्गामध्ये आहे. त्याला आता चिंताजनक म्हणून गणना करण्याची आता वेळ आली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
 
चित्यांच्या ऐतिहासिक रहिवासापैकी आतापर्यंत 91 टक्के रहिवास संपुष्टात आला आहे. एकेकाळी संपूर्ण आफ्रिका आणि आग्नेय अशियामध्ये चित्यांचा रहिवास विस्तारलेला होता. चित्ता आशिया खंडातून तर आता अदृश्यच झाला आहे.
 
इराणमध्ये 50 पेक्षाही कमी संख्येने चित्ता अस्तित्वात आहे, असे प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियत कलिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन लेखात म्हटले आहे.
 
झिंबाब्बे देशात 1999 मध्ये 1200 चित्ते होते. ती संख्या 2015 मध्ये 170 एवढीच उरली. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील जमीन धारणा आणि इतर धोक्यांची गुंतागुंत वाढल्याने चित्त्यांवर हा विपरित परिणाम झाला आहे.