गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (13:14 IST)

चीन, भारत आणि रशिया खराब हवेसाठी पावले उचलत नाहीत, असा आरोप ट्रम्प यांनी केला

कोरोनाचं संकट असतानाच अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. निवडणूक उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांनी भारतावर टीका केली आहे. "भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
 
ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला. 'अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे' असं म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलाबाबत घेतलेल्या भूमिकेवर यापूर्वीही टीका करण्यात आली आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीदेखील हवा प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर विरोधकांसोबतच भारत, रशिया आणि चीनवर टीका केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन जिंकल्यास त्या निकालाला विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात आव्हान देण्याचीही शक्यता आहे. कोरोना साथीला फार महत्त्व न देणाऱ्या तसेच विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनाच जेव्हा त्या संसर्गाची बाधा झाली त्यावेळी रिपब्लिकन पक्ष हादरला होता.