बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2024 (10:00 IST)

गूपॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी, आता ते अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार का?

donald trump
अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यायालयानं एका ऐतिहासिक निर्णयात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात दोषी ठरवलं आहे.या प्रकरणात त्यांना 11 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी मात्र हा निर्णय लज्जास्पद आणि हेराफेरी असलेला आहे, असं म्हटलं.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षाविरुद्ध फौजदारी खटला चालवून त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा प्रचार करणाऱ्या टीमनं, 'कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही'असं म्हणत या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत.
दोषी ठरविल्यानंतर, ट्रम्प यांचा प्रचार करणाऱ्या टीमनं त्यांचा उल्लेख 'राजकीय कैदी'असा केला. तसंच यानंतर लोकांनी मोठ्या संख्येनं देणगी दिल्याचा दावाही केला आहे.
 
जो बायडेन सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. ट्रम्प यांना अजून मतदानाच्या माध्यमातून पराभूत व्हायचं असल्याचं, त्यांच्या प्रचार अभिनायात म्हटलं आहे.
 
ट्रम्प यांच्यावर 2016 च्या निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला काही बोलू नये म्हणून पैसे देऊन (हश मनी) ती बाब लपवल्याप्रकरणी तसंच व्यावसायिक रेकॉर्डमध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी 34 आरोप आहेत.
 
ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. स्टॉर्मी डॅनियलसोबत लैंगिक संबंध असल्याचंही त्यांनी नाकारलं आहे.
 
ट्रम्प निवडणूक लढवू शकतात का?
डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयानं दोषी ठरवलं असलं तरीही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील त्यांची उमेदवारी कायम राहू शकते.
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी किमान पात्रता गरजेची असते. त्यात किमान 35 वर्षे वय, अमेरिकेचे आजन्म नागरिकत्व आणि किमान 14 वर्षे अमेरिकेत वास्तव्य यांचा समावेश आहे.
 
गुन्हेगारी नोंदी असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेत कोणतीही तरतूद नाही.
 
अमेरिकेत तुरुंगात असलेली व्यक्तीही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते.
 
काय आहे प्रकरण?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला काही बोलू नये म्हणून पैसे दिल्याचे तसेच या खटल्यात पेमेंट करण्यासाठी व्यवसायात खोट्या नोंदी केल्याचा आरोप आहे.
 
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सनं ती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लैंगिक संबंध होते, असा आरोप केला आहे.
 
या प्रकरणाबद्दल गप्प राहण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्प यांच्याकडून 1,30,000 डॉलर्स मिळाले होते. ही रक्कम ट्रम्प यांच्या माजी वकिलानं 2016च्या निवडणुकीपूर्वी दिली होती, असा आरोप होता.
 
या वकिलाचं नाव मायकल कोहेन असं असून त्यांना नंतर विविध आरोपांखाली तुरुंगवास झाला होता.
 
हे आरोप 2018 मध्ये उजेडात आले. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सबरोबर कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध ठेवल्याचे आरोप फेटाळले होते.
 
कोण आहे स्टॉर्मी डॅनियल्स?
स्टॉर्मी डॅनियल्स ही 45 वर्षांची असून तिचं खरं नाव स्टेफनी क्लिफोर्ड आहे.
 
अमेरिकेतील लुईसिआना इथं जन्मलेली स्टॉर्मी डॅनिएल्स एक पॉर्न स्टार आणि दिग्दर्शक आहे. तिच्या चित्रपटांसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
 
पॉर्न फिल्म्सबरोबरच तिनं हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येदेखील भूमिका केल्या आहेत. यात 'द 40 ईयर ओल्ड व्हर्जिन' आणि 'नॉक्ट अप' यासारखे 2000च्या दशकातील विनोदी चित्रपटदेखील आहेत.
 
ती राजकारणात देखील उतरली होती आणि सुरुवातीला ती रिपब्लिकन पक्षाकडून होती. डोनाल्ड ट्रम्प याच रिपब्लिकन पक्षाचे आहेत.
 
स्टॉर्मी डॅनियल्सचा आरोप
स्टॉर्मी डॅनियल्सने प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतींमध्ये म्हटलं होतं की, डोनाल्ड ट्रम्पची आणि तिची भेट जुलै 2006 मध्ये समाजसेवेसाठी निधी गोळा करणाऱ्या एका गोल्फ स्पर्धेत झाली होती.
 
डोनाल्ड ट्रम्प आणि तिने कॅलिफोर्निया आणि नेवाडा दरम्यान असणाऱ्या लेक ताहो या रिसोर्ट मधील हॉटेलच्या रुममध्ये एकदा सेक्स केल्याचा आरोप तिनं केला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या वकिलानं डॅनिएल्सचा आरोप धुडकावून लावला होता.
 
ट्रम्प यांनी तिला त्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल गप्प राहण्यास सांगितलं आहे का? असा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता. त्यावर ''त्यांना याबद्दल कोणतीही चिंता दिसत नाही. ते खूपच उद्धट आहेत,'' असं उत्तर डॅनियल्सनं दिलं होतं.
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिआ ट्रम्प त्या गोल्फ स्पर्धेच्या ठिकाणी हजर नव्हत्या. त्यांनी त्यावेळी नुकताच बाळाला जन्म दिला होता
 
गप्प राहण्यासाठी पैसे आणि धमक्या
स्टॉर्मी डॅनियल्स म्हणाल्या की, कोहेन या वकिलानं 2016च्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच तिला 1,30,000 डॉलर्सची रक्कम दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या संबंधांबद्दल गप्प राहण्यासाठी तिला हे पैसे देण्यात आले होते. त्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाला होता.
 
डॅनियल्स यांच्या मते, त्यांनी ते पैसे घेतले कारण त्यांना कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता वाटत होती. गप्प राहण्यासाठी तिला मारण्याच्या आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
 
2018 मध्ये लास वेगासच्या पार्किंग परिसरात एक अनोळखी व्यक्ती डॅनियल्स आणि तिच्या लहान बाळाला भेटली होती. त्या व्यक्तीनं डॅनिएल्सला धमकावताना ट्रम्पपासून दूर राहण्यास सांगितलं होतं.
 
तिनं 'इन टच' या मासिकाला या कथित प्रकरणाबद्दल मुलाखत देण्यास होकार दिल्यानंतर लगेचच हा प्रसंग घडला असल्याचं डॅनिएल्स सांगतात.
 
'सीबीएस 60 मिनिट्स'ला दिलेल्या मुलाखतीत डॅनियल्सने या घटनेचं वर्णन केलं होतं.
 
ही मुलाखत प्रसारित होण्याआधी कोहेनशी संबंधित एका बनावट कंपनीनं डॅनियल्सला धमकावलं होतं. या कंपनीनं डॅनियल्सला त्यांच्यावर 2 कोटी डॉलर्सचा खटला दाखल करण्याची धमकी दिली होती. गप्प राहण्यासाठी डॅनिएल्सनं त्यांच्याबरोबर केलेली डील मोडल्याचं त्या कंपनीचं म्हणणं होतं.
 
स्टॉर्मी डॅनियल्सनं सीबीएस मधील कार्यक्रमात सांगितलं होतं की, राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीशी बोलून ती लाखो डॉलर्सच्या दंडाचा धोका पत्कारते आहे. ''मात्र स्वत:चा बचाव करता येणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं.''
 
'60 मिनिट्स'च्या मुलाखतीच्या तीन महिने आधीपर्यत इन टच ला डॅनिएल्सनं दिलेली मुलाखत 2018 पर्यत पूर्ण प्रकाशित झाली नव्हती.
 
गप्प राहण्यासाठी पैसे देणे बेकायदेशीर आहे का?
बेकायदेशीर कृत्याबद्दल किंवा गोपनीय बाबींबद्दल गप्प राहण्यासाठी पैसे देणं हे बेकायदेशीर नाही. मात्र फिर्यादी पक्षानं या प्रकरणात, कोहेन यांनी या पैशांची नोंद ट्रम्पच्या खात्यात ज्या पद्धतीनं केली होती त्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं.
 
ट्रम्प यांनी व्यवसायात खोट्या नोंदी करत ही रक्कम कायदेशीर बाबींसाठी केलेला खर्च म्हणून दाखवली होती.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्या काही दिवस आधीच ही रक्कम देण्यात आली होती. जिल्हा दंडाधिकारी ऑल्विन ब्रॅग यांनी मतदानावर प्रभाव टाकणारी माहिती लपविण्यासाठी केलेले गुन्हे लपवण्यासाठीचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला होता, असा आरोप केला.
 
ऑगस्ट 2018 मध्ये कोहेन यांना तुरुंगवास झाला होता. कर चुकवेगिरी आणि प्रचार करताना आर्थिक नियम मोडल्याचं सिद्ध झाल्यामुळं कोहेनना शिक्षा झाली होती. यातील काही भाग स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्पबरोबरच्या संबंधांबद्दल गप्प राहण्यासाठी पैसे देण्याशी संबंधित होता.
 
सुरुवातीला कोहेन यांनी ट्रम्प यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा इन्कार केला होता. पण नंतर त्यांनी ट्रम्प यांनीच डॅनियल्सला 1,30,000 डॉलर्सची रक्कम देण्यास सांगितलं होतं, असा जबाब दिला होता.

Published By- Priya Dixit