क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे निधन
क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि महान क्रांतिकारक नेते फिडेल कॅस्ट्रो (९०) यांचे निधन झाले आहे. फेब्रुवारी 1959 ते डिसेंबर 1976 पर्यंत फिडेल यांनी क्युबाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर ते क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले. फेब्रुवारी 2008 साली त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. क्युबात कम्युनिस्ट राजवटीचा एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यात फिडेल कॅस्ट्रो यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९५९ साली चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली. त्यानंतर फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष बनले. क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला. यावर संतापून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी क्युबावर आर्थिक निर्बंध घातले आणि राजनैतिक संबंधही तोडून टाकले होते. मात्र फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वामुळेच क्युबाने अमेरीला टक्कर देण्यात यशस्वी झाला.