मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (11:27 IST)

जॉर्डनचे माजी क्राऊन प्रिन्स हमजा बिन हुसैन नजरकैदेत

जॉर्डनचे माजी क्राऊन प्रिन्स हमजा यांनी आपल्याला घरातच नजरकैद केल्याचं सांगितलं आहे.
प्रिन्स हमजा यांनी हमजा बिन हुसैन यांच्या वकिलांनी एक व्हीडिओ बीबीसीला पाठवला आहे. प्रिन्स हमजा हे किंग अब्दुल्ला यांचे सावत्र भाऊ आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि छळाचे आरोप करण्यात आले आहेत. हा प्रकार समोर आल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक मोठ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
याआधी प्रिन्स हमजा यांना नजरकैद केल्याचं वृत्त सैन्यानं फेटाळलं होतं.
मात्र देशाचे संरक्षण आणि स्थैर्याला धोकादायक ठरणाऱ्या त्यांच्या हालचालींना रोखल्याचं सैन्यानं सांगितलं होतं.
 
प्रिन्स हमजा काय म्हणाले?
प्रिन्स हमजा यांनी आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं सांगितलं आहे तसेच कोणत्याही कटात आपण सामिल नसल्याचं त्यांनी सांगितलं.
 
शनिवारी रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओत ते म्हणतात, "जॉर्डनच्या सैन्याचे चीफ ऑफ जनरल स्टाफ आज सकाळी माझ्या घरी आले होते. मी ज्या बैठकांमध्ये सहभागी झालो त्यामुळे सोशल मीडियावर होत असलेल्या पोस्ट्समुळे सरकार आणि राजेसाहेबांवर टीका होते त्यामुळे मला बाहेर जाण्याची, लोकांशी बोलण्याची परवानगी नाही. असं त्यांनी मला सांगितलं."
पण मी स्वतः टीका केल्याचा माझ्यावर आरोप नसल्याचं सांगितलं.
अर्थात, त्यानंतर ते पुढे म्हणाले, "सरकारमधील पडझड, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेसाठी मी जबाबदार नाही. हे सगळं आपल्या शासनव्यवस्थेत गेल्या 15-20 वर्षांपासून होत आहे आणि ती स्थिती अधिकच चिघळत चालली आहे. त्यांच्या (सरकारच्या) संस्थांमध्ये लोकांचा विश्वास कमी होण्याला मी जबाबदार नाही."
"कोणीही धमकावल्याशिवाय, अटक करुन छळल्याशिवाय बोलू शकत नाही अशा स्थितीत आपण पोहोचलो आहोत."
जॉर्डनमध्ये उच्चपदस्थ राजकीय नेत्यांना अटक होण्याच्या घटना फारशा घडत नाहीत. मध्य पूर्वेत अमेरिका जॉर्डनचा मुख्य सहकारी आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीनंतर जॉर्डनच्या गुप्तचर संस्थेला जास्त अधिकार देण्यात आले आहेत. त्याला मानवाधिकार संघटना विरोध करत आहेत.
इजिप्त, अमेरिका आणि सौदी अरेबियानं राजे अब्दुल्ला यांचं समर्थनच केलं आहे. (राजे अब्दुल्ला यांना किंग अब्दुल्ला असं संबोधलं जातं आणि त्यांचा उल्लेखही तसाच केला जातो)
 
प्रिन्स हमजा कोण आहेत?
माजी क्राऊन प्रिन्स हमजा हे दिवंगत किंग हुसैन आणि त्यांची आवडती पत्नी क्वीन नूर यांचे सर्वांत कनिष्ठ पुत्र आहेत. प्रिन्स हमजा ब्रिटनच्या हॅरो स्कूल अँड रॉयल मिलिटरी अकॅडममध्ये शिकले आहेत. त्यांनी अमेरिकेत हॉर्वर्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले व जॉर्डनच्या सैन्यात सेवा बजावली आहे.
1999मध्ये त्यांना जॉर्डनचे क्राऊन प्रिन्स ही उपाधी मिळाली. ते दिवंगत किंग हुसैन यांचे सर्वात प्रिय होते.
परंतु किंग हुसैन यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी होण्यासाठी त्यांना अत्यंत तरुण आणि अनुभवहीन मानलं गेलं.
त्यानंतर किंग अब्दुल्ला राजगादीवर आले आणि 2004 साली त्यांनी हमजा यांची क्राऊन प्रिन्सही उपाधी काढून घेतली.
महाराणी नूर यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.
 
अशा घडल्या घटना
बीबीसीचे संरक्षण विषयक प्रतिनिधी फ्रँक गार्डनर यांनी या घटनांचं, अत्यंत वाईट पद्धतीने हाताबाहेर गेलेलं शाही संकट असं वर्णन केलं आहे.
जॉर्डनच्या शाही कुटुंबात घडलेल्या घटना याआधी इतर देशांमधील शाही कुटुंबातही झाल्या आहेत. मात्र जॉर्डनचे स्वतःचे असे वेगळे प्रश्न आहेत.
गार्डनर म्हणतात, "कोरोना साथीमुळे त्यांची अर्थव्यवस्था वाईट स्थिती आहे आणि लोक त्रस्त होत चालले आहेत. हमजा यांच्या व्हीडिओमुळे दुबईची राजकन्या लतिफाच्या व्हीडिओची आठवण करुन देतो. प्रिन्स हमजा यांनी आपल्या सरकारवर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि अकार्यक्षमतेचे आरोप केले आहेत."
"आपल्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. राजधानी अम्मानच्या बाहेर त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला नजरकैद केलं आहे व त्यांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत असं ते सांगत आहेत."
 
कोणाकोणाला झाली अटक?
जॉर्डन अमेरिकेचा मुख्य सहकारी देश आहे. संरक्षणासंबंधित कारवायांमध्ये अमेरिकेचं सैन्य त्यांना मदत करतं. इस्लामिक स्टेटच्या विरोधातील कथित मोहिमांमध्येही अमेरिकेनं सहकार्य केलं आहे.
शनिवारी अटक झालेल्या लोकांत माजी अर्थमंत्री बासेम अव्दल्ला आणि शाही कुटुंबातील सदस्य शरीफ हसन बिन जाएद यांना अटक झाली आहे.