मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (09:50 IST)

भारताचं ब्रिटनला प्रत्युत्तर, ब्रिटीश प्रवाशांना व्हावं लागणार क्वारंटाईन

ब्रिटनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांना लसीकरणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या त्रासाची दखल घेत, भारतानंही प्रत्युत्तर दिलं आहे. भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठीही कोव्हिड 19 बाबत कठोर नियम लागू करण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे.
 
4 ऑक्टोबरपासून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना या नियमांचं पालन करावं लागेल. या नागरिकांच्या लसीकरणाची स्थिती काहीही असली, तरी त्यांच्यासाठी हे नियम अनिवार्य असतील. या नियमांनुसार ब्रिटश नागरिकांना भारतात येण्याच्या 72 तास आधीचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवावा लागेल. तसंच भारतात आल्यानंतर विमानतळावरही त्यांची कोव्हिड 19 ची RT-PCR चाचणी केली जाईल.
 
एवढंच नव्हे तर, भारतात दाखल झाल्यानंतर 8 व्या दिवशी पुन्हा एकदा या ब्रिटिश नागरिकांना कोव्हिड-19 च्या RT-PCR चाचणीला सामोरं जावं लागेल.
 
लशीचे डोस घेतलेले असले तरी ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवसांसाठी होम क्वारंटाईन किंवा त्यांना जिथं जायचं आहे, त्याठिकाणी विलगीकरणात राहावं लागेल, असादेखील निर्णय सरकारनं घेतला आहे.
 
भारतासह अनेक देशातील प्रवाशांचे लशीचे दोन डोस झालेले असले, तरी ते लसीकरण ब्रिटनमध्ये ग्राह्य समजलं जात नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळंत, ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी असे निर्णय घेण्यात आल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
 
भारतानं ब्रिटनला कोव्हिशिल्ड लशीचे 50 लाख डोस दिले आहेत. इंग्लंडनं त्याचा वापरही केला आहे. असं असतानाही कोव्हिशिल्डला मान्यता न देणं हा भेदभाव असल्याचं भारताच्या परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी म्हटलं आहे.