1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (09:20 IST)

Israel Hamas War: हमासविरोधातील लढा आणखी तीव्र केला जाईल: बेंजामिन नेतन्याहू

Benjamin Netanyahu
Israel Hamas War: येत्या काळात हमासविरोधात आणखी तीव्र लढा दिला जाईल,' असे सूतोवाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले आहे.
नेतन्याहू यांनी त्यांच्या पक्षातील सदस्यांना सांगितले की, त्यांनी सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी गाझाला भेट दिली. इस्रायलची लष्करी कारवाई अद्याप संपलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
इस्रायलने हल्ल्याची तीव्रता कमी करावी असे आवाहन अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटनी केल्याच्या काहीच दिवसानंतर नेत्यानाहूंनी हे विधान केले आहे.
 
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर घातक हल्ला केल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली.
 
गाझातील हमास संचलित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत या युद्धात 20,674 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातील बहुतांश बळी हे महिला आणि मुलांचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
हमासच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलच्या 240 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. इस्रायलचे म्हणणे आहे की, अद्यापही 132 जणांना ओलीस ठेवण्यात आलेले आहे.
 
हमासला नष्ट करून आपल्या नागरिकांना सोडवून आणू असा प्रण नेतन्याहूनी केला आहे.
 
लिकुड पार्टीच्या बैठकीत नेतन्याहू यांनी सांगितले की 'आपण गाझाला जेव्हा भेट दिली तेव्हा लष्कराशी चर्चा केली. आपला लढा सुरू ठेवावा असं लष्कराने म्हटलं आहे.'
 
'त्यांनी केवळ एकाच गोष्टीची विनंती केली, ती म्हणजे हा लढा थांबवू नका,' असं नेतन्याहू म्हणाले.
 
'तेव्हा आपण आता थांबायचं नाही, येत्या काळात ही लढाई आणखी तीव्र होईल, ही लढाई अजून काही काळ चालेल आणि ही निश्चितपणे संपण्याच्या उंबरठ्यावर नाही,' असं नेतन्याहू म्हणाले.
 
दरम्यान, इस्रायली आणि अरब माध्यमांनी म्हटले आहे की, इजिप्तने दोन्ही देशांना युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे.
 
असं म्हटलं जात आहे की, या प्रस्तावानुसार इस्रायलच्या ज्या नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे त्यांची सुटका केली जाईल आणि युद्ध सुरू झाल्यापासून जे पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलच्या तुरुंगात डांबण्यात आले आहेत त्यांची सुटका केली जाईल.
 
सध्या तरी इस्रायल आणि हमास यांनी युद्धबंदीच्या हाकेला विरोध दर्शवल्याचे दिसत आहे.
 
रविवारी (24 डिसेंबर) गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रविवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अल-मघाजी या शिबिरातील 70 शरणार्थींचे प्राण गेले.
 
पॅलेस्टाइन रेड क्रेसेंट सोसायटीने म्हटले आहे की, इस्रायलच्या तीव्र हवाई हल्ल्यामुळे मघाजीतील रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे अल बुरेज आणि अल नुसैरत या ठिकाणी असलेल्या शरणार्थी शिबिरांपर्यंत मदत पोहोचणे हे कठीण झाले आहे.
 
बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत इस्रायलने लष्कराने सांगितले की 'मघाजी शिबिराबाबत माहिती घेण्यात आली आहे.'
 
"हमासचे दहशतवादी नागरिकांच्या वस्तीतून आमच्याशी झुंज देत असल्यामुळे आमच्यासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे पण असे असले तरी इस्रायल डिफेन्स फोर्सकडून आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन होत आहे. नागरिकांचे कमीत कमी नुकसान व्हावे याची आम्ही काळजी घेत आहोत," असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले.
 
Published By- Priya Dixit