“वॉशिंग्टन पोस्ट’ने घेतली मराठा मोर्चाची दखल
मुंबईत 9 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल अमेरिकेतील “द वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने घेतली आहे. सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी क्रांतिदिनाच्या ( 9 ऑगस्ट ) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये महामोर्चा काढून ऐतिहासिक विजय नोंदवला. जी अस्वस्थता मराठा समाजामध्ये आहे तिचा स्फोटच एकप्रकारे आझाद मैदानावर पाहायला मिळाला.
या मोर्चाने आरक्षणाची मागणी वगळता बहुतांश मागण्या सरकारला मान्य करण्यास भाग पाडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळाशी बोलल्यानंतर विधिमंडळाच्या सभागृहात मराठा समाजाच्या मागण्या आणि सरकारची भूमिका मांडली. आरक्षणाविषयी ठोस भूमिका स्पष्ट केली नाही आणि ज्या शेतीवर बहुसंख्य मराठा समाज राबतो आहे, त्या शेतीतील दुखण्यावर कोणता उपाय करण्यात येणार आहे याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. या दोन बाबी सोडल्या तर उर्वरित मागण्यांवर सकारात्मक विचार झाला असून काही निर्णयही घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी त्याचवेळी एक माहिती दिली की, मराठा समाजाच्या समस्या आणि मागण्या यांचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसिमिती स्थापन करण्यात येणार आहे. दर तीन महिन्यांतून त्याची बैठक होणार आहे. या मागण्यांवर अजूनही चर्चा अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.