एक आणखी चाचणी करण्याच्या तयारीत उत्तर कोरीया
लागोपाठ धमाकेदार क्षेपणास्त्र चाचण्या करून साऱ्या जगाचा रोष ओढवून घेतलेल्या उत्तर कोरीयाने आणखी एक क्षेपणास्त्र चाचणी करण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे.अमेरिका आणि दक्षिण कोरीयाच्या निरीक्षकांनी सांगितले की संशयित ठिकाणी क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी लागणारी सामग्री घेऊन जाणारी वाहने येजा करताना दिसत आहेत. कोरीयन युद्ध समाप्तीचा 64 वा स्मृती दिन येत्या 27 जुलैला आहे त्याची संधी साधून ही चाचणी करण्याची उत्तर कोरीयाची तयारी सुरू झाली आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियात 27 जुलै हा सार्वत्रिक सुट्टीचा दिवस असतो. उत्तर प्योंगंन भागात ही चाचणी करण्याची त्या देशाच्या सरकारची तयारी असल्याचे अमेरिकन निरीक्षकांनी सांगितले. या चाचण्यांच्या विरोधात अमेरिकेसह अन्य देशांनी उत्तर कोरीयाला गंभीर परिणामांचा इशारा या आधीच दिला आहे पण त्याचा उत्तर कोरीयाच्या सरकारवर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही.