शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (16:59 IST)

रगदः सद्दाम हुसैनच्या मृत्यूच्या 15 वर्षांनंतर त्यांच्या मुलीनं केली 'ही' विनंती

इराकचे राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांना 30 डिसेंबरला फाशी देण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूच्या 15 वर्षांनंतर त्यांची मुलगी रगद हुसैन यांनी इराकच्या लोकांना एकत्र येण्याची आणि अरबी विश्वात बदल घडवण्यासाठी भूमिका निभावण्याचं आवाहन केलं आहे.
 
वडिलांच्या मोठ्या फोटोसमोर बसलेल्या रगद यांनी इराकच्या लोकांना शत्रूत्व विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. समुदाय किंवा यापूर्वीच्या गोष्टी मागेच सोडून एकमेकांना माफ करा, असं रगद म्हणाल्या आहेत.
 
''इराकनं अरबांच्या कोणत्याही गटात सहभागी होऊ नये. माझी विनंती आहे की, आपसांतील मतभेद विसरून जा. सर्वांची शक्ती एकवटली जाईल तेव्हाच आपल्याला इराकसाठी काही तरी करता येईल,'' असं रगद यांनी वडिलांच्या 15 व्या मृत्यूदिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या संदेशामध्ये म्हटलं आहे.
 
भविष्यात इराकच्या राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता रगद यांनी फेटाळली नाही. ऑक्टोबर क्रांतीमध्ये ज्यांनी आप्तेष्ठ गमावले आहेत, त्यांनी याच्या गुन्हेगारांना माफ करता कामा नये.
रगद यांनी इराकच्या संरक्षण दलांच्या म्हणजे इराणचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांच्या आंदोलकांवरील गोळीबाराचा हवालाही दिला.
 
रगद हुसैन कोण आहेत?
इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांची मोठी मुलगी म्हणजे रगद.
 
रगद शाळेत शिकत असतानाच त्यांचा विवाह झाला होता.
 
त्यावेळी त्यांचं वय अवघं 15 वर्षे होतं. लग्न झालं तेव्हा इराक आणि इराणमध्ये युद्ध सुरू होतं.
 
फेब्रुवारी 1996 मध्ये 25 वर्षांच्या असताना रगद यांनी कुटुंबाने सांगितल्यानुसार तलाक (घटस्फोट) घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली होती.
रगद यांचा निकाह सद्दाम हुसैनचे चुलत भाऊ हुसैन केमेल अल माजीद यांच्याशी झाला होता. त्यावेळी हुसैन केमेल यांच्यावर सद्दाम हुसेन यांच्या संरक्षणाची जबाबदारी होती. सद्दाम यांची दुसरी मुलगी राणा सद्दाम यांचा विवाहदेखील केमेल यांचे भाऊ अल माजीदबरोबर झाला होता.
 
दोन्ही मुलींचे लग्न, तलाक आणि त्यांच्या पतींच्या हत्या ही अत्यंत दु:खद कहाणी आहे. 2018 मध्ये रगद सद्दाम हुसैनचं नाव तत्कालीन इराक सरकारनं 'मोस्ट वाँटेड' यादीत टाकलं होतं.
रगद सद्दाम हुसैन यांनी याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात अल-अरबियाला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. लग्नासाठी वडील सद्दाम हुसैन यांचा दबाव होता का, असा प्रश्न रगद यांना विचारण्यात आला होता.
 
याचं उत्तर देताना, ''माझ्या वडिलांनी पाचपैकी कोणत्याही मुलावर लग्नासाठी दबाव टाकला नाही. एखाद्यानं मुलींच्या लग्नाचा प्रस्ताव आणला तरी, ते आम्हालाच काय करायला हवं असं विचारायचे. त्यांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी तेव्हा किशोरवयीन होते. उन्हाळ्यातील दुपारची वेळ होते. माझ्या वडिलांना दार वाजवलं आणि माझ्या खोलीत आले. मी तेव्हा झोपले होते. त्यांनी अत्यंत प्रेमानं मला उठवलं. अंथरुणावर माझ्या शेजारी बसले. माझी चौकशी केली आणि विचारलं, तुझा एक प्रेमी आहे ना?" त्यांनीच त्याचं नावही सांगितलं.
 
विवाह कुटुंबातच होणार होता त्यामुळं फार काही अडचणीचा विषय नव्हता. तुला होकार किंवा नकार देण्याचा अधिकार आहे, असं माझे वडील म्हणाले. ते हे सर्व बोलत असताना मला लाज वाटत होती. तेव्हा तुझा निर्णय आईला सांग, असं ते म्हणाले. हुसैन केमेल अल-माजीद माझ्या वडिलांच्या संरक्षण दलात होते त्यामुळं सद्दाम हुसेनबरोबर त्यांची रोज भेट व्हायची. माझे वडील इतर अंगरक्षकांना जेवणासाठी बोलवायचे. त्यात त्यांचाही समावेश असायचा.''
''आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो. माझ्या आईला माहिती होतं. तेव्हा मी लहानच होते. पण प्रेमाचं रुपांतर लवकरच लग्नात झालं. लग्नानंतर मी शिक्षण सुरू ठेवलं आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. माझ्या पतीला मी शिकलेलं आवडत नव्हतं. पण तरीही मी शिक्षण पूर्ण केलं. इराकमध्ये तेव्हा सुरक्षेबाबत काही अडचण नव्ही. माझे पती माझ्यावर प्रेम करायचे तसंच माझा आदरही ठेवायचे. माझ्या आई-वडिलांचाही आदर करायचे. ''
 
'वडिलांच्या प्रेमाची तुलना नाही'
''माझे वडील माझ्यावर प्रचंड प्रेम करत होते. त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. त्यांनी जेवढं प्रेम दिलं, त्याची तुलना माझे पती किंवा माझी मुलं कोणाशीही करता येणार नाही," असं रगद म्हणाल्या होत्या.
रगद इराक-इराण युद्धाच्या वेळेस त्या लहान होत्या आणि शाळेत जायच्या. त्यावेळच्या युद्धाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
 
''त्यावेळी आमचं आणखी एक घर होतं. आम्हाला तिथंही जाता येता येत होतं. मी एक दिवस शाळेत गेले नाही. कारण प्रचंड बॉम्बहल्ले झाले होते. त्यावेळी माझे वडील लष्कराच्या गणवेशात आले आणि मला शाळेत का गेले नाही असं विचारलं. मी युद्धाचा धोका असल्याबाबत सांगितलं, तेव्हा ते म्हणाले इराकची इथर मुलं शाळेत जात आहेत, तुही जायला हवं. त्यांनी म्हटलं की, तू शाळेत गेली तर इतर मुलांची भीतीही दूर होईल. तू त्यांची काळजीही घ्यायला हवी. सद्दाम हुसेनच्या मुली असल्यानं आम्हाला वेगळे विशेष अधिकार मिळू नये, अशी त्यांची इच्छा होती.''
 
रगद म्हणाल्या होत्या की, त्या राजकीय निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नव्हत्या. पण माणुसकीच्या दृष्टीनं घेतलेल्या अनेक निर्णयात सहभागी असल्याचं त्या म्हणाल्या. अनेक मुद्द्यांवर पतीबरोबरही माझे वाद व्हायचे, असंही त्या म्हणाल्या.
 
पती आणि पित्यामधील संघर्ष
रगद यांनी पती हुसैन केमेल आणि पिता सद्दाम हुसैन यांच्या नात्यात निर्माण झालेल्या कटुतेबाबतही चर्चा केली होती. ''माझे एकटीचेच पती मारले गेले होते, असं नाही. त्यावेळी इराकमध्ये अनेक महिलांचे पती मारले गेले. पतींबरोबरच त्यांचे वडील, मुलं यांचाही समावेश होता. माझे पती 1995 च्या ऑगस्ट महिन्यात जॉर्डनला गेले.
 
त्यांनी जाताना माझ्याशी संपर्क केला होता. मला वाटलं ते इथं राहिले तर रक्तपात होऊ शकतो. कुटुंबातच अशा गोष्टी घडतात. त्यामुळं मी त्यांच्या इराक सोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. सद्दाम हुसेन यांची मुलगी असल्यामुळं मला दुसऱ्या देशात जाणं शक्य नव्हतं.
 
जॉर्डनमध्ये जोशात आमचं स्वागत झालं. मी बाहेरची आहे, असं कधीही वाटलं नाही. पण पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आलं तेव्हा, काय सांगितलं जाईल, याचा मला अंदाज नव्हता.''
''जॉर्डनला गेल्यानंतर पत्रकार परिषदेत काय बोललं जाणार आहे, याचा मला अंदाज नव्हता,'' असं रगद यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
या पत्रकार परिषदेत हुसैन केमेल सद्दाम हुसैन यांच्या विरोधात बोलले होते. ते जॉर्डनला आल्याने सद्दाम यांचं शासन हललं आहे, असं ते म्हणाले होते. तसंच त्यांनी इराकच्या सैनिकांना सत्ता परिवर्तनासाठी सज्ज राहण्यासही सांगितलं होतं.