मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (16:59 IST)

श्रीलंका: आंदोलक शिरले राष्ट्रपतींच्या घरात, स्वीमिंग पुलमध्ये मारल्या उड्या

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान आज दुपारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी घेराव घातला.
 
तसेच काही आंदोलकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश केला. इतकंच नव्हे तर राष्ट्रपती निवासस्थानी असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ते आंघोळीचा आस्वादही घेत असल्याचे काही व्हीडिओ समोर आले आहेत.
 
काल श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक बसेस, रेल्वे आणि ट्रकमधून कोलंबोत दाखल झाले आहेत.
 
आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेशाचे प्रयत्न केले. यावेळी निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
 
यानंतर जमाव पांगला मात्र काही तासांतच पुन्हा जमा झाला. यावेळी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरू ठेवला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली.
 
हवेत गोळीबार होत असून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर सुरूच आहे. या अश्रुधुराचा 5 जणांना त्रास झाल्याचं समजलं आहे.
दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात घुसण्यास सुरुवात केली. यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांच्या झटापटीत पोलिसांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली.
 
काही आंदोलक निवासस्थानाच्या मुख्य गेटवर चढून निवासस्थानात घुसले. आंदोलनस्थळी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
 
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सध्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आहेत की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
 
अश्रुधुरामुळे जखमी झालेल्या बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.
 
दिवसभरात काय काय घडलं?
देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा संताप नागरिकांमध्ये दिसून येत आहे. श्रीलंकेची जनता इंधन,अन्न, औषधे यांच्या टंचाईशी तीव्र झुंज देत आहे. याचमुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्याविरोधात निदर्शने तीव्र होत आहेत.
 
त्यामुळे आज सरकारविरोधी आंदोलन पुकारण्यात आले होते. विरोधी पक्ष, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, कृषी संघटना इत्यादींनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं मान्य केलं.
 
कालपासून देशाच्या विविध भागातून विद्यार्थी संघटना राजधानी कोलंबोच्या दिशेने येऊ लागल्या. आज सकाळीही श्रीलंकेच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने आंदोलक कोलंबोत दाखल होताना दिसले.
 
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू असलेल्या रिकाम्या स्टेडियमबाहेरही आंदोलक मोठ्या संख्येने जमले आहेत.