1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (22:12 IST)

युक्रेनच्या डोनेस्तक शहरात स्फोटाचा आवाज, कारण स्पष्ट नाही; बायडेन पुतिनला भेटण्यास तयार

पूर्व युक्रेनमधील रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या डोनेत्स्क शहरात स्फोटाचा आवाज ऐकू आला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोमवारच्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की रशियाने आपल्या सैन्याला युद्ध सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या विभागाचे म्हणणे आहे की, रशियन सैन्याला हल्ल्याचे आदेश देण्यात आले आहेत किंवा योजनेच्या अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. मात्र व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने याला दुजोरा दिलेला नाही.
 
युक्रेनच्या शेजारी देश बेलारूसमध्ये सुमारे 20,000 सैनिक तैनात करण्यात आले आहेत. सध्या युक्रेनच्या सीमेबाहेर रणगाडे, युद्धविमान, तोफखाना इत्यादींसह सुमारे 150,000 रशियन सैन्य तैनात आहेत. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्याच्या उपस्थितीने चिंता वाढवली आहे. तीन तासांपेक्षा कमी अंतरावर असलेल्या युक्रेनची राजधानी कीववर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केलीआहे.
 
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सीमेवर वाढलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान संकट सोडवण्यासाठी बोलावले आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्यूनिच सुरक्षा परिषदेत सांगितले की "मला माहित नाही की रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांना काय हवे आहे, म्हणून मी बैठकीचा प्रस्ताव देत आहे. युक्रेन केवळ राजनयिक मार्गाने शांततापूर्ण समाधानाचा पाठपुरावा करत राहील."
 
रशियाने युक्रेनवर हल्ला न केल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी 'तत्त्वतः' बैठक घेण्यास तयार आहेत, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे . फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मध्यस्थीने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिला आहे.