रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (17:22 IST)

इराणमध्ये महिला सार्वजनिकरित्या हिजाब जाळतायत, कारण...

iran hijab issue
- ऋजुता लुकतुके
इराणच्या करमन शहरात एक महिला भर रस्त्यात वाहतूक अडवून आपल्या गाडीच्या बॉनेटवर उभी राहिली. त्यानंतर तिने सर्वासमोर चक्क डोक्यावरचा हिजाब उतरवला आणि तो पेटवून दिला! तिच्याबरोबर तिथं शेकडो महिला होत्या. पुरुषही होते जे या घटनेचा व्हीडिओ घेत होते. सगळे मिळून घोषणा देत होते हुकुमशाह मुर्दाबाद!
 
इराणमध्ये 22 वर्षीय महिसा अमिनीचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे शहरा-शहरांमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटलंय. आणि सरकारनेही हे आंदोलन चिरडून टाकण्याचा कडक इशारा दिलाय.
 
खरंतर मागची 14 वर्षं महिलांची हिजाबमधून सुटका व्हावी यासाठी तिथं आंदोलन सुरू आहे. इराणमधलं हे आंदोलन आणि तिथं महिलांवर कधीपासून आणि कोणते निर्बंध आहेत हे समजून घेऊया.
 
एरवी केस मोकळे सोडले तर काय मोठं असं कुणालाही वाटू शकेल. पण, इराणच्या कट्टरतावादी मुस्लीम राजवटीत तो गुन्हा आहे.
 
महिलांसाठीचा ड्रेसकोड पाळला नाही तर तिथले नैतिकतावादी पोलीस तुम्हाला अटक करू शकतात.
 
महिलांना अर्थातच या अटी जाचक वाटतात. आणि मागची काही वर्षं अधून मधून तिथं हिजाब विरोधी आंदोलनं होत असतात. पण, 13 सप्टेंबरचा दिवस वेगळा होता.
 
मेहसा अमिनी या 22 वर्षीय महिलेला पोलिसांनी हिजाब नियमाचं पालन न करण्यावरून हटकलं. पोलिसांचं म्हणणं होतं की तिने हिजाब नीट घातला नव्हता.
 
दोघांमध्ये हुज्जत झाली. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं.
 
पोलीस कोठडीत असतानाच ती बेशुद्ध झाली आणि कोसळली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी हे सगळं टिपलं पण ही दृश्यं खूप एडिट केलेली होती.
 
रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती कोमात गेली आणि तीन दिवसांनी मेहसाचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासन म्हणतं, 'तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला.' पण लोक म्हणतात पोलिसांनी तिला दंडुक्याने मारहाण केली होती, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी आरोप फेटाळलाय आणि म्हटलंय की तिचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. मेहसाच्या घरचे म्हणतात की ती निरोगी होती. पण, महसाच्या मृत्यूनंतर इराणमध्ये पुन्हा एकदा हिजाब विरोधी आंदोलन उग्र झालंय. महिलांवर नेमके कोणते निर्बंध आहेत, जे महिलांना नको आहेत?
 
इराणमध्ये महिलांसाठी ड्रेस कोड
एकूणच मुस्लीम समाजामध्ये महिलांनी कसा पेहराव करावा आणि घराबाहेर असताना कसं वागावं याचे काही नियम आहेत. आणि काही देशांमध्ये जिथे मुस्लीम बहुसंख्य आहेत तिथे कमी - अधिक प्रमाणात लोकशाही व्यवस्था रुजली असली तरी महिला स्वातंत्र्याच्या बाबतीत रुढीवाद्यांचाच पगडा जास्त आहे.
 
1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि इस्लामिक प्रजासत्ताक बनलं. आजवर इराणचे सर्वोच्च नेते हे धार्मिक नेतेच राहिलेत.
 
लोकशाही निवडणुका होतात, पण निकालांनाही सर्वोच्च नेत्याकडून संमती मिळावी लागते. धोरणं तसंच त्यांच्या अंमलबजावणीवर त्यांचंच नियंत्रण असतं. सध्या अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत.
 
इस्लामिक इराणमध्ये हिजाबविषयीचे कायदे काय आहेत?
 
घराबाहेर फिरताना महिलांनी केस पूर्णपणे झाकले जातील असा हिजाब परिधान केला पाहिजे.
अंग झाकेल असे सैलसर कपडे घातले पाहिजेत.
महिला हा ड्रेसकोड पाळतात की नाही हे तपासण्यासाठी गश्त-ए-इर्शाद नावाचं नैतिकता तपासणारं पोलीस दल गावांमध्ये तैनात असतं.
या पोलिसांना कुठेही महिलांची तपासणी करण्याचा आणि गुन्हा निश्चित करण्याचा संपूर्ण अधिकार.
महिला दोषी आढळल्यास दंड, तुरुंगवास आणि लोकांसमोर चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली जाते.
या पोलीस दलाकडे अधिकार एकवटलेले असल्यामुळे अनेकदा त्यांच्यावर मनमानी केल्याचा आरोप होतो.
 
हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून असे व्हीडिओही व्हायरल होतात. आणि त्यातून हिजाबविरोधी आंदोलन इराणमध्ये आणखी जोर धरतंय.
 
उदाहरण म्हणून ट्विटर लिंकमधला हा व्हीडिओ बघा. एका वयस्क महिलेला हे पोलीस केस पूर्ण झाकले नाहीत म्हणून भर बाजारात चक्क थोबाडीत मारतेय.
 
याविरोधात महिला एकत्र आल्या नाहीत असं नाही. 2014 पासून तिथं हिजाबविरोधी आंदोलनं सुरू आहेत. आणि सोशल मीडियावर त्यासाठी मोहीम सुरू करण्याचं श्रेय इराणी-अमेरिकन पत्रकार मसिह अलीनेजाद यांना जातं.
 
इराणमधलं हिजाबविरोधी आंदोलन
मसिह यांना हिजाबविरोधी आंदोलनासाठी पहिल्यांदा अटक झाली 1994मध्ये. तेव्हा त्यांनी इराणी कट्टरतावादी राजवटीविरोधात पत्रकं वाटली होती.
 
त्यानंतर त्यांचं इराणमध्ये राहणंच मुश्कील झालं. आणि त्यांनी 2009मध्ये देश सोडून अमेरिकेचा आसरा घेतला. 2019मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्वही मिळालं.
 
सोशल मीडियाचा जोर वाढल्यावर मसिह यांनी एक अनोखं आंदोलन सुरू केलं. एकदा त्यांनी एका टेकडीवर जाऊन केस मोकळे सोडले. आणि 'हिजाब नसताना हा मोकळा वारा माझ्या केसांनाही स्पर्श करत होता अशी पोस्ट ट्विटरवर टाकली.' ते 2014 साल होतं.
 
तेव्हापासून हिजाब न घातलेले फोटो शेअर करणं, महिलांना पाठिंबा म्हणून पुरुषांनी हिजाब घालणं, महिलांनी एकत्र येऊन आपल्या हिजाबांची होळी करणं अशी आंदोलनं इराणभर पेटली. हॅशटॅग प्रसिद्ध झाला. #LetUsTalk, किंवा #MyStealthyFreedom किंवा #WhiteWednesday.
 
मसिह अजूनही अधून मधून हिजाब जाहीरपणे काढून टाकण्याचे व्हीडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर करतात. हिजाब का घालायचा नाही, याविषयी सविस्तर पोस्ट लिहितात.
 
इराणच्या सरकारला अर्थातच हा बदल रुचलेला नाही. आणि आताही आंदोलन चिरडून टाकू अशी धमकी देत त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इराणमध्ये सध्या परिस्थिती चिघळलेली आहे.