1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पाकमध्ये सहा सैनिक ठार

अमेरिकी मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हल्ला

पाकिस्तानातील क्वेट्टा शहरामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या सहा सैनिकांसह नऊ जण मृत्युमुखी पडले.

या हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाउचर क्वेट्टा शहराच्या दौर्‍यावर होते. हे शहर अफगाणिस्तान सीमेच्या जवळ आहे. तालिबान अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने केलेल्या प्रयत्नांची पाहणी करण्यासाठी बाउचर येथे आले होते.

पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल वहीद अरशद यांनी सांगितले, की काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी रेल्वे स्टेशनजवळ लष्कराच्या एका गाङीवर हल्ला केला. त्यात सहा सैनिकांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची स्थिती गंभीर आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने क्वेट्टाच्या प्रेस क्लबला फोन करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.