बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (17:54 IST)

IPL 2022: परपल कॅप ते नेट बॉलर; मोहित शर्माच्या आयपीएल कारकीर्दीची उतरती कळा

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा खेळाडूंना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळं काही मिळवून देतो. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या अनेक खेळाडूंना आयपीएलने आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. अनेकांच्या गुणवत्तेला आयपीएलचं व्यासपीठ मिळालं आणि त्यातूनच टीम इंडियाचा दारंही खुली झाली.
 
पण सगळ्यांच्या बाबतीत हा आलेख उंचावणारा नाहीये. मोहित शर्मा आणि बरिंदर स्राण या भारतासाठी खेळलेल्या दोन गोलंदाजांची वाट आयपीएलच्या परिघातच भरकटली आहे.
 
यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघ आयपीएल पदार्पण करतो आहे. गुजरात टायटन्सने मोहित शर्मा आणि बरिंदर स्राण या वेगवान गोलंदाजांना नेट बॉलर म्हणून समाविष्ट केलं आहे. भारतासाठी खेळलेले तसंच आयपीएलमध्येही अनेक संघांचा अविभाज्य भाग असलेले हे दोघं आता नेट बॉलर झाले आहेत. या दोघांच्या बरोबरीने ल्यूकमान मेरिवालाही गुजरात संघाचा नेट बॉलर आहे.
 
फलंदाजांना सराव व्हावा यासाठी संघातील गोलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाज ताफ्यात समाविष्ट केले जातात. त्यांना नेट बॉलर म्हटलं जातं. नेट बॉलर फलंदाजांसमोर गोलंदाजी करतात. या व्यवस्थेमुळे मुख्य गोलंदाज स्वतंत्रपणे सराव करू शकतात.
 
सर्वसाधारणपणे युवा गोलंदाजांना नेट बॉलर म्हणून घेतलं जातं. त्यांना मोठ्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याची, शिकण्याची संधी मिळते. दुखापतीमुळे किंवा कोरोनामुळे संघातील मुख्य गोलंदाज खेळू शकणार नसतील तर नेट बॉलर्सना मुख्य संघात समाविष्ट केलं जातं.
 
गुजरात टायटन्सकडे वरुण आरोन, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, दर्शन नालकांडे, यश दयाळ हे वेगवान गोलंदाज आहेत. वरुण आणि प्रदीप यांच्याइतकाच अनुभव मोहित आणि बरिंदरकडे आहे. पण या हंगामात तरी ते नेट बॉलर असणार आहेत.
 
गुजरात टायटन्स संघाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करण्यात आला. 'फर्स्ट ट्रेनिंग' या कॅप्शनसह गुजरात टायटन्सने शेअर केलेल्या फोटोत मोहित शर्मा आणि बरिंदर स्राण दिसत आहेत. या फोटोत मोहित-बरिंदरला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सना उधाण आलं. एकेकाळी परपल कॅपचा मानकरी मोहितला नेट बॉलर झालेलं पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
 
मोहित शर्मा कोण आहे?
33वर्षीय मोहित डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हरियाणासाठी खेळतो. 2012-23 रणजी हंगामात मोहितने 7 सामन्यात 37 विकेट्स घेत छाप उमटवली. या कामगिरीची दखल घेत आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सने मोहितला ताफ्यात समाविष्ट केलं. तीन हंगाम मोहित धोनीच्या नेतृत्वात खेळला. धोनीचा विश्वासू साथीदार असल्याने मोहित बहुतांश सामने खेळला. कामगिरीत सातत्य असल्याने मोहित संघाचा अविभाज्य भाग होता.
 
2014 मध्ये मोहित 'परपल कॅप' पुरस्काराचा मानकरी ठरला होता. हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांला परपल कॅपने सन्मानित करण्यात येतं. त्या हंगामात मोहितने 16 सामन्यात 19.65च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या होत्या.
 
त्यानंतर तीन हंगाम मोहित किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला. पण तो लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. 2019 मध्ये पुन्हा चेन्नईने त्याला संघात समाविष्ट केलं. 2020 हंगामाआधी दिल्ली कॅपिटल्स संघाने मोहितला संघात घेतलं.
 
2021 हंगामामध्ये मोहित कोणत्याही संघाचा भाग नव्हता. 2022 हंगामासाठी झालेल्या लिलावात मोहित शर्माच्या नावाला कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही.
 
आयपीएल स्पर्धेत मोहितच्या नावावर 92 विकेट्स आहेत.
 
वेगाच्या बरोबरीने फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारे स्लोअर वन्स टाकण्यासाठी मोहित प्रसिद्ध आहे.
 
2015 विश्वचषकात मोहित शर्मा भारतीय संघाचा भाग होता. मोहितने 26 वनडे, 4 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
 
बरिंदर स्राण कोण आहे?
डावखुरा वेगवान गोलंदाज कोणत्याही संघांसाठी निर्णायक ठरू शकतात. बरिंदर स्राण डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. बरिंदर पूर्वी बॉक्सिंग खेळायचा, नंतर त्याने क्रिकेट निवडलं.
 
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बरिंदर पंजाबकडून खेळतो. सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे बरिंदरसाठी आयपीएलची दारं खुली झाली. 2015 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकरता खेळला. 2016 आणि 2017 मध्ये बरिंदर सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. 2016 मध्ये सनरायझर्सने जेतेपदावर नाव कोरलं होतं. बरिंदर आयपीएलविजेत्या संघाचा भाग होता.
 
2018 वर्षी बरिंदर पंजाब किंग्ज संघाकडून खेळला. पण पंजाबने त्याला रिलीज केलं. 2019 मध्ये मुंबई इंडियन्सने बरिंदरला संघात घेतलं.
 
आयपीएल स्पर्धेत बरिंदरच्या नावावर 24 सामन्यात 18 विकेट्स आहेत.
 
2016 मध्ये बरिंदरने भारतासाठी पदार्पण केलं. बरिंदरने 6 वनडे आणि 2 ट्वेन्टी20 लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.