शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 25 मे 2022 (22:32 IST)

आयपीएलः अंतिम सामन्यासाठीचे नियम जाहीर; विजेता याच्यानुसारच ठरणार

इंडियन प्रीमियर लीग २०२२ शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लीगचे सामने संपले असून आता ४ प्लेऑफ बाकी आहेत. आयपीएलने प्ले ऑफ आणि फायनलच्या खेळाच्या परिस्थितीबाबत नियम जारी केले आहेत. फायनलसह चारही सामने पावसामुळे खेळवले गेले नाहीत किंवा सामना वेळेवर झाले नाही तर सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरने घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. जर ग्राऊंडची परिस्थिती मॅच खेळण्यायोग्य नसेल तर टेबलमधील टॉप संघाला विजेते घोषित केले जाईल.
 
२४ मे रोजी पहिल्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स संघ २५ मे रोजी एलिमिनेटरमध्ये भिडतील. हे दोन्ही सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. दुसरा क्वालिफायर २७ मे रोजी आणि अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. रात्री ८ वाजता फायनल सुरू होईल. अंतिम फेरीसाठी ३० मे हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. कोणत्याही कारणास्तव त्या दिवशी अंतिम सामना होऊ शकला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. कोलकात्यात पावसाची शक्यता आहे.
 
वेळापत्रकात आणखी दोन तासांची भर पडली आहे. तिन्ही प्लेऑफ रात्री ९.४० पर्यंत उशिरा सुरू होऊ शकतात. अंतिम फेरी १०.१० वाजता सुरू होऊ शकते. पहिला डाव संपल्यानंतर ब्रेकची वेळ कमी केली जाऊ शकते. प्लेऑफमध्ये ओव्हर्सदेखील कमी केले जाऊ शकतात. मात्र, दोन्ही संघांना किमान ५ – ५ ओव्हर खेळण्याची संधी मिळेल याची काळजी घेतली जाईल. यासाठी कट ऑफ टाइम ११.५६ मिनिटे ठेवण्यात आला आहे. दहा मिनिटांचा इनिंग ब्रेक असेल
 
प्लेऑफ सामन्यात, त्याच दिवशी अतिरिक्त वेळेत ५ ओव्हरही होऊ शकल्या नाहीत, तर विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हरची मदत घेतली जाईल. सुपर ओव्हर न झाल्यास, टेबलमधील अव्वल संघ प्लेऑफचा विजेता घोषित केला जाईल.