सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (15:50 IST)

IPL 2023 MI Vs KKR :अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले, एमआय कडून खेळणार

IPL 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. कर्णधार रोहित शर्मा आजचा सामना मुंबईसाठी खेळत नाहीये. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव आज मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे.
 
23 वर्षीय अर्जुनचा प्रथमच मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. अर्जुनचा यंदाच्या लिलावात मुंबई संघाने 30 लाख रुपयांना आपल्या संघात समावेश केला होता. दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संघात संधी देण्यात आली आहे.
 
मुंबईचे कर्णधार असलेल्या सूर्याने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, रोहितला पोटात काही समस्या आहे. त्यामुळेच तो आज खेळत नाही. त्याच्या जागी अर्जुन मुंबईसाठी आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. अर्जुनचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर देखील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत.
 
नाणेफेकीच्या वेळी सूर्या म्हणाला, “खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे. आम्हाला इथे पाठलाग करायला आवडेल. आज आमच्या संघात बदल झाला आहे. रोहितला पोटाचा त्रास आहे. त्यामुळेच तो आज खेळत नाही.
 
अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 9 टी-20 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये 10 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अर्जुन एकेकाळी मुंबईच्या रणजी संघाचा भाग होता पण नंतर त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अर्जुन बराच काळ मुंबई इंडियन्सच्या शिबिराशी जोडला गेला होता पण पदार्पण करण्यासाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली जी आज संपली.

Edited By - Priya Dixit