शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 1 मे 2023 (08:41 IST)

MI vs RR : मुंबईचा विक्रमी विजय; यशस्वी जैस्वालचं शतक व्यर्थ

विजयासाठी 213 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमधल्या 1000 लढतीत दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईच्या खेळाडूंनी कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाची अनोखी भेटही दिली. शेवटच्या षटकात मुंबईला 17 धावांची आवश्यकता होती.
 
मुंबईच्या उंचपुऱ्या टीम डेव्हिडने सलग 3 षटकार खेचत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानसाठी 21वर्षीय यशस्वी जैस्वालचं शतक ही जमेची बाजू ठरली. पण यशस्वीच्या शतकी खेळीला विजयाचं कोंदण लाभलं नाही. वानखेडे मैदानावर आयपीएल लढतीत 200 धावांचा यशस्वी पाठलाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यशस्वीला शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा झटपट तंबूत परतला. पण इशान किशन आणि कॅमेरुन ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 62 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी पॉवरप्लेचा पुरेपूर उपयोग करुन घेत फटकेबाजी केली. रवीचंद्रन अश्विनने इशान किशनला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 23 चेंडूत 28 धावांची खेळी केली.
 
ग्रीनने फटकेबाजी सुरुच ठेवली. अश्विननेच ग्रीनचा अडथळा दूर केला. ग्रीनने 26 चेंडूत 44 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूपासून चौकार-षटकारांची आतषबाजी सुरु केली. सूर्यकुमारने तिलक वर्माच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली.
 
ट्रेंट बोल्टने सूर्यकुमारला बाद करत राजस्थानच्या विजयाच्या आशा जागवल्या. सूर्यकुमारने 29 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावांची आक्रमक खेळी साकारली. सूर्यकुमार बाद होताच मुंबईवरचं दडपण वाढलं. मुंबईला 26 चेंडूत 61 धावांची आवश्यकता होती. प्रत्येक षटकात जवळपास 15 धावा करणं गरजेचं होतं.
 
टीम डेव्हिड आणि तिलक वर्माने पाचव्या विकेटसाठी 23 चेंडूत 62 धावांची भागीदारी करत मुंबईला थरारक विजय मिळवून दिली. डेव्हिडने 14 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 45 धावांची अविश्वसनीय खेळी केली. तिलकने 21 चेंडूत 29 धावा करत डेव्हिडला चांगली साथ दिली. धावांच्या राशी ओतल्या जात असतानाही अश्विनने 4 षटकात केवळ 27 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या.
 
ट्वेन्टी20 सामना साधारणत: तीन तासात संपणं अपेक्षित असतं. मात्र आयपीएलची ही 1000लढत रविवारी रात्री 7.30 वाजता सुरू झाली पण सामना संपायला जवळपास 12 वाजले. मुंबईने विजय मिळवला तेव्हा घड्याळ्यात सोमवार सुरू झाला होता.
 
“गेल्या वर्षीही यशस्वीचा खेळ मी पाहिला होता. मी त्याला यंदा विचारलं, फटके मारण्यासाठी एवढी ताकद कुठून आणलीस? त्यावर तो म्हणाला- जिमला जातो आहे. यशस्वीला गेल्या हंगामातही खेळताना पाहिलं होतं. तो प्रतिभावान खेळाडू आहे. यंदा त्याने त्याचा खेळ एका वेगळ्यात पातळीवर नेला आहे. ही राजस्थान रॉयल्स आणि भारतीय संघासाठी चांगली गोष्ट आहे”, असं मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सामना संपल्यानंतर बोलताना म्हणाला.
 
दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननेही यशस्वीच्या खेळीचं कौतुक केलं. “आधीच्या लढतीतही यशस्वीने 77 धावांची खेळी केली. तो अफलातून फॉर्ममध्ये आहे. अशी खेळी साकारेल हे जाणवतच होतं. त्याने दिमाखदार खेळी केली. दुर्देवाने आम्ही विजय मिळवू शकलो नाही पण त्याच्या खेळीने मनोमन आनंद झाला”, असं संजूने सांगितलं.
 
यशस्वीच्या बॅटचा तडाखा
मूळचा उत्तर प्रदेशचा पण मुंबईतल्या मैदानांवर बॅटने हुकूमत गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वालने रविवारी वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्ससाठी दिमाखदार शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेतल्या 1000व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध यशस्वीने आयपीएल स्पर्धेतल्या पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली. 21वर्षीय यशस्वीने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांसह 124 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.
 
यंदाच्या हंगामातलं हे तिसरं शतक आहे. याआधी हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांनी शतकी खेळी केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सतर्फे याआधी अजिंक्य रहाणे, जोस बटलर, बेन स्टोक्स, शेन वॉटसन, संजू सॅमसन यांनी शतकी खेळी केली आहे. यशस्वीच्या दमदार खेळीच्या बळावर राजस्थानने 212 धावांचा डोंगर उभारला. यशस्वीचा अपवाद सोडला तर राजस्थानच्या एकाही फलंदाजाला २० धावांची वेसही ओलांडता आली नाही.
 
कोण आहे यशस्वी जैस्वाल?
उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत धावांच्या राशी ओततोय.
 
2015 मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध गाईल्स शिल्ड स्पर्धेत यशस्वीने नाबाद 319 धावांची खेळी केली. याच सामन्यात त्याने 13 विकेट्सही घेतल्या.
 
2019मध्ये विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध यशस्वीने 154 चेंडूत 203 धावांची आक्रमक खेळी साकारली. 17व्या वर्षी द्विशतक झळकावत स्पर्धेतला सगळ्यात कमी वयाचा द्विशतकवीर ठरला.
 
2020 मध्ये झालेल्या आयसीसी U19 स्पर्धेत यशस्वीने सर्वाधिक धावा (400) केल्या होत्या. यशस्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. याच वर्षी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने यशस्वीला ताफ्यात समाविष्ट केलं. 2022 मध्ये राजस्थानने 4 कोटी रुपयांच्या मानधनासह यशस्वीला संघात रिटेन केलं.
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ 13 डावात यशस्वीने 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वीने अमोल मुझुमदार आणि रुसी मोदी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. यशस्वीने अवघ्या 7 सामन्यात 91च्या सरासरीने खेळताना हा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे.
 
रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत यशस्वीने शतक झळकावण्याची किमया केली आहे. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतही यशस्वीने द्विशतकी खेळी केली होती.
 
धोनीला केला होता नमस्कार
2020 आयपीएल हंगामात यशस्वीने धोनीला हात जोडून नमस्कार केला होता. तो नमस्कार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यादरम्यान लढत होती. मॅचपूर्वी टॉससाठी चेन्नईचा कॅप्टन धोनी आणि राजस्थानचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ पिचपर्यंत गेले. टॉस झाला आणि दोन्ही कॅप्टन्स परतू लागले. धोनीला पाहून प्रत्येकजण हाय फाईव्ह देऊ लागला. न्यू नॉर्मलनुसार हातांच्या मुठी पंचसारख्या करून नमस्कार चमत्कार होतात.
 
धोनी समोर आल्यावर यशस्वीच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण मोठ्या प्लेयरला भेटल्याचं समाधान त्याच्या डोळ्यात दिसत होतं. सगळे हाय फाईव्ह देत होते. धोनीला पाहून यशस्वीने गुरुजींना करतात तसा रीतसर हात जोडून नमस्कार केला, धोनीने नीट पाहिलं आणि छानसं स्माईल दिलं. धोनी चाळिशीत आलाय. यशस्वी विशीत आहे.
 
धोनीने करिअरमध्ये असंख्य युवा खेळाडूंनी संधी दिलेय, त्यांच्या कठीण काळात ठामपणे मागे उभा राहिलाय, खेळत असताना सल्ला दिलाय. असे असंख्य यशस्वी धोनीने पाहिलेत. यशस्वीसाठी ही सुरुवात आहे. या टप्प्यावरून हरवून जाणारेही खूप आहेत. मोठ्ठा पल्ला गाठायचाय पण अजूनतरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो स्थित्यंतराचा क्षण होता.
Published By -Smita Joshi