रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (22:39 IST)

IPL 2023 :शुबमन गिलचं पहिलं वहिलं आयपीएल शतक

शुबमन गिलने अहमदाबाद इथे सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध आयपीएल स्पर्धेतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. शुबमन गिल हा गुजरात टायटन्स संघातर्फे शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. 23व्या वर्षी शुबमनच्या गिलच्या नावावर टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 तसंच आयपीएल स्पर्धेत शतक नावावर आहे. शुबमनने 58 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 101 धावांची खेळी केली. टी.नटराजनच्या चेंडूवर एक धाव घेत गिलने आयपीएल स्पर्धेतल्या पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली.
 
प्लेऑफसाठी विजय आवश्यक असणाऱ्या गुजरातची सुरुवात डळमळीत झाली. वृद्धिमान साहा भोपळाही फोडू शकला नाही. पण यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनने 36 चेंडूत 47 धावांची खेळी केली. सुदर्शन बाद झाल्यानंतर गुजरातचे बाकी फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत गेले. गिलने एका बाजूने किल्ला लढवत शानदार शतकी खेळी साकारली. गुजरातच्या 4 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. हैदराबाद संघातर्फे भुवनेश्वर कुमारने 5 विकेट्स घेतल्या.
 
ठरला होता युवा द्विशतकवीर
 
धडाकेबाज युवा सलामीवीर शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद इथे द्विशतक साजरं केलं. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचत शुबमनने द्विशतकाला गवसणी घातली.
 
वनडेत द्विशतक झळकावणारा शुबमन सगळ्यात लहान वयाचा फलंदाज ठरला.
 
शुबमनने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची मॅरेथॉन खेळी केली.
 
शुबमनच्या खेळाच्या बळावर भारतीय संघाने 349 धावांचा डोंगर उभारला.
 
हे वनडे क्रिकेटमधलं दहावं वैयक्तिक द्विशतक आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, इशान किशन यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तर तीन द्विशतकं आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिलं द्विशतक झळकावण्याचा मान मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरकडे जातो.
 
कोण आहे शुबमन गिल?
प्रतिभेला अविरत मेहनतीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाच्या चाहत्यांसमोर आहे. 2020 मध्ये बॉक्सिंग डे दिवशी शुभमनने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत शुभमनने प्रयत्नपूर्वक ही संधी मिळवली आहे.
 
2018 मध्ये U19 वर्ल्डकप स्पर्धेत शुभमनने सर्वाधिक रन्स करत ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता. सरळ बॅट, डोकं स्थिर स्थितीत, हाय बॅकलिफ्टसह उंचावर जाणारा कोपरा, उसळत्या चेंडूवर पकड मिळवण्याची खुबी यामुळे शुभमन ज्या संघाकडून खेळतो तिथले प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ, वरिष्ठ खेळाडू यांचं लक्ष वेधून घेतो.
 
2018-19 रणजी हंगामात शुभमनने 9 डावात 104च्या सरासरीने 728 धावांची लूट केली. चांगल्या संघांविरुद्धची ही कामगिरी लक्षात घेऊन भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघात समाविष्ट करुन घेतलं.
 
टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने शुभमनच्या खेळाचं कौतुक केलं होतं. 2019 वर्ल्ड कपनंतर या मुलाला भारतीय संघात घ्यायला हवं असंही युवराज म्हणाला होता.
 
वर्षभरात शुभमनचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. न्यूझीलंड दौऱ्यात शुभमनने वनडे पदार्पण केलं. त्याच वर्षी शुभमनने भारतीय अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडली आणि मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. या दौऱ्यात त्याने 204 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.
 
मायदेशी परतल्यानंतर भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुख्य बॅट्समन आणि कर्णधारपद अशा दोन्ही भूमिका शुभमन गिल याने समर्थपणे सांभाळल्या होत्या.
 
2018 मध्ये आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 1.8 कोटी रुपये खर्चून शुभमनला संघात समाविष्ट केलं. ओपनर आणि भविष्यातील कॅप्टन म्हणून केकेआर संघ शुभमनकडे पाहतो आहे. शुभमननेही सातत्याने चांगल्या खेळी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. 2019 हंगामात शुभमनची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर म्हणून निवड झाली. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामात शुभमनने 440 रन्स केल्या.
 
सध्या शुबमन गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. तब्बल 8 कोटी रुपये खर्चून गुजरातने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. शुबमनने संघाचा विश्वास सार्थ ठरवत दमदार कामगिरी केली होती.
Published By- Priya Dixit