सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Updated : शनिवार, 8 एप्रिल 2023 (22:34 IST)

RR Vs DC: राजस्थानचा दिल्लीवर 'रॉयल' विजय

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर दिमाखदार खेळ करत राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सवर 57 धावांनी मोठा विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल, जोस बटलर आणि ट्रेंट बोल्ट या विजयाचे शिल्पकार ठरले. बटलर-जैस्वाल यांच्या अर्धशतकांच्या बळावर राजस्थानने 199 धावांची मजल मारली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन विकेट्स दिल्लीला अडचणीत आणलं. सुरुवातीच्या धक्क्यातून दिल्ली सावरलंच नाही. दिल्लीने 142 धावा केल्या.
 
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे यांनी पहिल्याच षटकात गमावलं. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात विकेट्स पटकावण्याची परंपरा कायम राखली. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही झुंजार खेळी केली. वॉर्नरने 65 धावांची खेळी केली. वॉर्नर-ललित यादव जोडीने चौथ्या विकेटसाठी 44 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. ललितने 38 धावा केल्या. दिल्लीच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. राजस्थानतर्फे ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
 
यशस्वी जैस्वालने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत खलील अहमदच्या एका षटकात 5 चौकार लगावले. एक चेंडू निर्धाव पडला अन्यथा यशस्वीचं नाव विक्रम यादीत दाखल झालं असतं. यशस्वी जैस्वाल, जोस बटलर यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर राजस्थानने दिल्लीसमोर 200 धावांचं लक्ष्य ठेवलं.
 
दरम्यान राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचा डोंगर उभारला.
 
डावाच्या पहिल्याच षटकात यशस्वीने डावखुऱ्या खलील अहमदला लक्ष्य करत चौफेर चौकारांची लयलूट केली. पहिल्या षटकात 5 चौकारांसह 20 धावा वसूल केल्यानंतर यशस्वीनेद दुसऱ्या षटकात वेगवान अँनरिक नॉर्कियाच्या गोलंदाजीवर 3 चौकार लगावले.
 
पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये राजस्थानने 68 धावांची मजल मारली. यशस्वीप्रमाणेच अनुभवी जोस बटलरने हाणामारीला सुरुवात केल्याने दिल्लीच्या अडचणी वाढल्या.
 
राजस्थानचा संघ दोनशेचा टप्पा सहज ओलांडेल असे वाटत होते. 9व्या षटकात 98 धावा पटावर असताना मुकेश कुमारने यशस्वी जैस्वालला बाद केलं. उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा यशस्वीचा प्रयत्न मुकेशनेच स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत संपुष्टात आला. यशस्वीने 31 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 60 धावा केल्या.
 
यशस्वीच्या जागी कर्णधार संजू सॅमसनचं आगमन झालं. पण तो भोपळाही फोडू शकला नाही. कुलदीप यादवच्या फिरकीचं कोडं संजूला उमगलं नाही. घरच्या मैदानावर खेळणारा रियान परागही मोठी खेळी करु शकला नाही. तो 7 धावा करुन तंबूत परतला. बटलर-हेटमायर या अनुभवी जोडीने पाचव्या विकेटसाठी 51 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली.
 
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या बटलरला मुकेश कुमारनेच बाद केलं. त्याने 51 चेंडूत 79 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली. हेटमायरने 21 चेंडूत नाबाद 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
 
दिल्लीने या सामन्यासाठी तीन बदल केले. सर्फराझ खान, मिचेल मार्श आणि अमन खान यांना वगळलं. मिचेल मार्श स्वत:च्या लग्नासाठी मायदेशी रवाना झाला आहे. दिल्लीने मनीष पांडे, रोव्हमन पॉवेल आणि ललित यादव यांचा संघात समावेश झाला. राजस्थानने संदीप शर्माला संघात समाविष्ट केलं.

Published By- Priya Dixit