आयपीएलमध्ये फिक्सिंगवरून प्रचंड वाद सुरू आहे. तसेच भारतीय क्रिकेटचा प्रायोजक असलेल्या सहारा ग्रुपने पुणे वॉरियर्सचा संघ आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वीच पुणे वॉरियर्ससाठी चिअर गर्ल्स म्हणून काम करणार्या अमृता मांडवीकरने चित्रपटांचा रस्ता धरला आहे.
भरत जाधवच्या ‘भुताचा हनिमून’मध्ये तिने आयटम साँग करून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. राज मोहिते यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पुढील आठवडय़ात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विनोदी असलेल्या या चित्रपटात अग्नीपथमधील कॅटरिना कैफच्या चिकनी चमेलीच्या धर्तीवर ‘तराट लोकांचा विराट मोर्चा’ नावाचे आयटम साँग तयार करण्यात आले आहे. या गाण्यात अमृता बेधुंदपणे थिरकताना दिसणार आहे. मोहिते यांनी गाण्याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला चित्रपटात एक आयटम साँग करायचे होते. प्रसंगाला अनुसरून असलेले हे गाणे जबरदस्त जमले आहे. प्रवीण कुंवर यांनी या गाण्याला उत्कृष्ट संगीत दिले असून भारती माढवी यांनी ते गायले आहे. या चित्रपटात भरत जाधव यानेदेखील दर्जेदार अभिनय केला आहे.