मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

राजस्थान विजयी; आता मुंबईशी गाठ

PR
सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाचा ब्राड हद्दीनने पाच षटकार खेचून नाबाद 54 धावा करीत राजस्थान रॉयल्सला सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेची क्वॉलीफायर फेरी गाठून दिली.

राजस्थानने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा 4 चेंडू आणि 4 गडी राखून पराभव केला. शुक्रवारी राजस्थान आणि मुंबई इंडियन्स संघात दुसरा उपान्त्य सामना खेळला जाईल. यातील विजेता संघ विजेतेपदासाठी चेन्नईशी अंतिम सामना खेळेल. हैदराबादच्या 133 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 19.2 षटकात 6 बाद 135 धावा केल. विजयासाठी शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. हॉजने सॅमीला लागोपाठ दोन षटकार खेचून संघाचा विजय साजरा केला.

राजस्थानची सुरुवात खराब ठरली. इशांत शर्माने कर्णधार राहुल द्रविडला (10 चेंडू, 3 चौकार 12) बाद केले. त्याचा झेल करण शर्माने घेतला. अजिंक्य राहाणे व शेन वॅटसन या दोघांनी दुसर्‍या जोडीस 37 धावांची भागीदारी 28 चेंडूत केली. वॅटसनचा झेल सॅमीने टिपला. त्याने 15 चेंडूवर 5 चौकारासह 24 धावा केल्या. त्यानंतर सॅमीने राजस्थानला दोन धक्के दिले. त्याने दिशांत याज्ञिक (0) आणि स्टुअर्ट बिन्नी (2) यांना त्रिफळा बाद केले.

सॅमसन व ब्रॉड हॉजची जोडी जमली. या दोघांनी सहाव्या जोडीस 35 चेंडूत 45 धावांची भर घातली. त्यावेळी डेल स्टेनने संजू सॅमसनला (10) पायचित केले. राजस्थानची स्थिती 6 बाद 102 अशी झाली. त्यांना 25 चेंडूत 31 धावांची विजयासाठी गरज होती. हॉज आणि फॉल्कनेर या दोघांनी डोके शांत ठेवून फलंदाजी केली. योग्य चेंडू पाहून त्यांनी शानदार फटकेबाजी केली. यामध्ये हॉजचा वाटा जास्त होता. हॉजने 29 चेंडूवर 2 चौकार आणि 5 षटकारासह नाबाद 54 धावा केल्या व तो सामनावीर ठरला. फॉल्कनेर याने 11 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 11 धावा केल. सॅमीनने 27 धावात 2, मिश्रने 16 धावात 1, करण शर्माने 24 धावात 1, स्टेनने 23 धावात 1 तर इशांत शर्माने 31 धावात 1 गडी टिपला.