आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी जावई गुरुनाथ मय्यपन याला अटक केली असली तरी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. काहीही झाले, तरी आपण राजीनामा देणार नाही. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि जावई असे कनेक्शन जोडले जात आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे दिवस अतिशय कठीण होते. मुळात फिक्सिंगचा माझा कसलाही संबंध नाही. त्यामुळे पद सोडण्याची आवश्यकता नाही. मी बीसीसीआयचा निवडून आलेला अध्यक्ष आहे. माझी कार्यपद्धती निष्पक्ष आणि जबाबदारीची आहे. मी काहीच चुकीचे केलेले नाही. त्यामुळे राजीनाम्याच्या मुद्यावरून बीसीसीआयमध्ये मतभेद असल्याचे पसरविले जात आहे. आतापर्यंत बोर्डाच्या एकाही सदस्याने राजीनामा देण्यास सांगितले नाही. बीसीसीआयचा माझ्यावर विश्वास आहे.
मय्यपनच्या चौकशीचे म्हणत असाल, तर माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणात माझ्यावर कसलेही आरोप झालेले नाहीत. त्यामुळे त्याबाबत विचार करण्याचा प्रश्चन येत नाही. प्रसारमाध्यमे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.