1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. आगामी नाट्य-चित्र

ज्वलंत समस्येवरचा ‘तहान'

PR
तहान सर्वांनाच लागते. ही तहान भागवण्यासाठी आजही महाराष्ट्रातील खेड्यापाडयात लाखो लोक वणवण भटकत आहेत. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्यांना ही समस्या अजिबात जाणवणार नाही. महाराष्ट्राचा काही भाग तर गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित आहे. या दुष्काळी समस्येवर सरकार काहीही ठोस उपाययोजना करू शकली नाही.

शेतकरी वर्ग सातत्याने आवाज उठवतोय. पण शासनापर्यंत त्यांचा आवाज पोहोचू शकत नाही. पाणी नाही म्हणून पीक नाही. पीक नाही म्हणून आवक नाही व आवक नाही म्हणून जीवन नाही. मग शेतकरी आपलं कुटूंब कसं पोसणार? अशा वेळी कर्ज काढण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. कर्ज तरी किती काढणार? काढलेलं कर्ज तो फेडणार तरी कशाच्या जीवावर? असे अनेक प्रश्न घेऊन आज महाराष्ट्रातील शेतकरी दिवस ढकलतोय व शेवटी आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. त्यांच्या असहायतेचा फायदा राजकिय नेते आपल्या फायद्यासाठी कसा घेतात. एखाद्याचं दुःख दुसया कुणाच्या सुखाचं साधन कसं बनू शकतं? याचं सुरेख चित्रण ‘तहान' चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे.

किसान पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते भिमसेन धोंडे निर्मित ‘तहान' आगस्टच्या पहिल्या आठवडयात मुंबई व अमरावती येथे प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दासबाबू यांनी केले असून कथा, पटकथा व संवाद पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. ‘तहान' हा चित्रपट सामाजिक बांधिलकी जपणारा चित्रपट असून ही एक राजकीय फॅंटसी आहे. राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकयांच्या आत्महत्या, सत्ताधारी तसेच विरोधकांचं या ज्वलंत समस्येकडे होत असलेले दुर्लक्ष, बोथट झालेल्या संवेदना व जनतेचा संताप व त्यातून होणारी आंदोलने यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

PR
निर्माते भीमसेन धोंडे यांचा हा दुसरा चित्रपट असून याआधी त्यांनी संघर्ष हा चित्रपट निर्माण केला होता. माजी आमदार असलेले धोंडे यांचा आष्टी तालुक्यातील. भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. शेतकर्‍यांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण असून या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मोर्चा, धरणे, पदयात्रा अशी अनेक आंदोलने केली आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पाण्याची भीषण समस्या व शेतकर्‍यांच्या आत्महत्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक दासबाबू यांचा हा पहिला चित्रपट असून त्यांनी आतापर्यंत ‘एक धागा सुखाचा', ‘वाजवा रे वाजवा', ‘आई’ या सारख्या विविध विषयांवरील मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. मुळात दासबाबू बंगाली. पण गेली अनेक वर्षे ते मुंबईत स्थायिक आहेत व त्या दरम्यान त्यांनी केवळ मराठीला आत्मसातच केली नाही तर मराठीला हृदयात दृढ स्थान दिलं आहे.

तहान' मध्ये सदाशिव अमरापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांची, अरूण नलावडे यांनी विरोधी पक्षनेत्याची, कुलदीप पवार यांनी गृहमंत्र्याची, विजय चव्हाण यांनी पत्रकाराची तर विक्रम गोखले डॉक्टरची भूमिका करीत आहेत. त्यांच्याबरोबर सुनील बर्वे, आदिती भागवत, किशोर नांदलस्कर, सुरेखा कुडची, अश्विनी एकबोटे, स्मिता ओक, किशोर प्रधान, अशोक समेळ, अभय कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. निर्माते धोंडे या चित्रपटात छोट्या भूमिकेत आहेत. मराठी वर्तमानपत्रातले खरेखुरे पत्रकार या चित्रपटात दिसणार आहेत. यात एकूण सात गाणी असून त्यात लावणी, गौरी गीत, द्वंद्वगीत, समुहगीत अशा विविध लोकसंगीताचा समावेष आहे. ही गीते सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, रविंद्र साठे, उत्तरा केळकर, अनुराधा पौडवाल, वैशाली सामंत, साधना सरगम, देवकी पंडीत, स्वप्नील बांदोडकर, विजय सरतापे, विट्ठल उमप यांनी गायिली आहेत. या गीतांची रचना जगदिश खेबुडकर यांनी केली असून त्यावर संगीताचा साज अच्युत ठाकूर यांनी चढविला आहे. नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार यांचे असून छायाचित्रण शंकर वर्धन यांचे आहे. वेषभुषा अंजली खोबरेकर, कला जयवंत वायंगणकर तर निर्मिती व्यवस्था घोषबाबू व सत्यवान गावडे यांची आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा