तिहेरी जाणिवेचा एकच ''गंध'' !
|
कुठलाही चित्रपट ध्वनी, प्रकाश, रंग, आकार इ. यांचा दृकश्राव्य अनुभव देतो पण गंधाचा - वासाचा अनुभव मिळत नाही. तो अनुभव हा चित्रपट देणार आहे. सुंगंधाचा दरवळ घेऊन येणरा गंध हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
गंध हा चित्रपट अनेक दृष्टीने मराठी चित्रपटांची चाकोरी मोडणारा आहे. एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा या निमित्ताने पाहावयास मिळणार आहेत. मराठीत असा प्रयत्न प्रथमच होत आहे. गंध या एकमेव मध्यवर्ती सुत्रानं बांधलेल्या तीन वेगवेगळ्या अवकाशात घडणार्या या कथा तेवढ्याच तरलतेने उलगडत जाणार्या आहेत.
या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, गिरिश कुलकर्णी, अमृता सुभाष, नीना कुलकर्णी या प्रतिभावान कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवुड स्टार आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण या चित्रपटाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करतोय.
|
सतत आव्हानांशी खेळणार्या या शिलेदारांनी गंधचा वेगळा कन्सेप्ट आव्हान म्हणूनच स्वीकारलाय. मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून देणं, अधिक उंचीवर नेणं हे आमचं ध्येय असून गंध द्वारे आम्ही मराठी चित्रपट नव्या युगाशी, या शतकाशी रिलेट करू पाहत आहोत अशी माहिती निर्मात्यांनी दिली.
|
गंध च्या निमित्ताने एक निराळ्या अनुभूतीचा प्रेक्षक आस्वाद घेऊ शकतील असा विश्वास कार्यकारी निर्माते रणजित गुगळे यांनी व्यक्त केला आहे.
या चित्रपटाची घोषणा प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, निर्माते व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकतीच पुण्यात करण्यात आली. येत्या काही दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरू होणार असून लवकरात लवकर हा जगावेगळा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या करीता आम्ही प्रयत्नशील आहोत असे निर्मात्या त्रयींनी या प्रसंगी सांगितले.
