१४ दिवसात तयार झालेला शिवामृत
चंद्रकांत शिंदे
WD |
वेबदुनियाशी बोलताना निळकंठ घरत यांनी सांगितले, माझा मित्र अजित सावंत चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे परंतु त्याने खूप पैसे घालवले. त्याला पुन्हा उभा करण्यासाठी मी मराठी चित्रपट निर्माण करण्याचे ठरवले. अनेक दिग्दर्शकांशी मी बोललो परंतु एकाशीही माझे मन जुळले नाही. एक दिवस मी प्रख्यात दिग्दर्शक सुभाष फडके यांना बोलावले आणि पहिल्याच मीटिंगमध्ये आमचे विचार जुळले आणि लगेच तिसर्या दिवशी आम्ही शिवामृत चित्रपटाला सुरुवात केली. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कर्जतमध्ये फक्त चौदा दिवसात आम्ही पूर्ण केले. हा चित्रपट अगोदर आम्ही मुंबईबाहेर प्रदर्शित करणार होतो. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटले की हा चित्रपट अगोदर मुंबईतच प्रदर्शित करावा म्हणून आम्ही मुंबईत चित्रपट प्रदर्शित करीत आहोत. अशोक शिंदे, पल्लवी वाघ. अमृता देशमुख, आनंद अभ्यंकर आणि शेखर फडके यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
दिग्दर्शक सुहास फडके यांनी यापूर्वी अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या हसरी चित्रपटाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. शिवामृतबद्दल त्यांनी सांगितले, ही भाऊ-बहिणीची कथा आहे. सदाशिव आणि अमृता हे भाऊ-बहिण आहेत. सदाशिव शिवभक्त आहे. शेती करून तो आपला परिवार सांभाळत असतो. बहिणीला मोठे करतो आणि तिचे चांगल्या घराण्यात लग्न लावून देतो. मात्र अमृताच्या सासरची मंडळी पैशांसाठी हावरट असतात. ते सतत सदाशिवकडे पैशांची मागणी करतात आणि अमृताचाही छळ करतात. शंकराची आराधना करणारा सदाशिव सगळ्या संकटांना पुरून उरतो. थोड़ा सा द्रार्मिक आणि थोडासा सामाजिक असा हा चित्रपट आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित हा चित्रपट असल्यानेच चित्रपटाचे नाव भावाच्या सदाशिवमधला शिव आणि बहिण अमृतामधील मृत शब्द घेऊन शिवामृत नाव ठेवले आहे. शिवामृत म्हणजे गंगा ही होते.
अशोक शिंदे याने सांगितले, हा एक खूपच चांगला चित्रपट असून शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सुभाष फडके यांच्याबरोबर मी अनेक चित्रपट केलेल आहेत आणि मला ठाऊक आहे कि ते माझ्यासाठी चांगली भूमिकाच निवडतात. निर्माते निळकंठ घरत यांच्या द्राडसाला मी दाद देतो. त्यांनी चित्रपटासाठी जे हवे ते दिले आणि फक्त चौदा दिवसात आम्ही हा चित्रपट पूर्ण केला.
या चित्रपटातून पल्लवी वाघ आणि अमृता देशमुख रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. पल्लवी अमृताची भूमिका साकारीत आहे जी अशोक शिंदेची बहिण आहे तर अमृता देशमुख अशोक शिंदेच्या पत्नीची भूमिका साकारीत आहे. पल्लवीने सांगितले, हा माझा पहिलाच चित्रपट परंतु मला सेटवर कधीही असे जाणवले नाही. सगळ्यांनी मला सांभाळून घेतले. चित्रपटात चार गाणी असून ती विश्वनाथ इवळेकर यांनी लिहिली आहेत. गीतांना संगीत दिले आहे अशोक वायंगणकर यांनी.

