Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी असे जरी आमुची मायबोली

Updated: सोमवार, 30 एप्रिल 2018 (13:23 IST)
गेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते.

भारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे? इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे? इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली? त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे? इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे? या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.

शिक्षणाच्या बाबतीत मराठी भाषा अथवा माध्यमांतून शिकणार्‍यांची संख्या गेल्या पन्नास वर्षात किती वाढली? मराठी माध्यामाच्या शाळा किती वाढल्या? लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात त्यांची टक्केवारी किती आहे? मराठी बाबतीत महाविद्यालयीन व विद्यापीठांची परिस्थिती काय दर्शविते?

महाराष्ट्रात हजारो मराठी स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या कार्याची माहिती एकत्रित केलेली कुठे आढळत नाही. मराठी पुस्तकांचे प्रकाशक आहेत. त्या पुस्तकांसाठी ग्रंथालये आहेत, त्यांच्या वाचकांची शक्यताही वाढत असवी. वेळोवेळी यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. नियतकालिके सुरू होतात व बंदही पडतात. मराठी वर्तमान पत्रे आहेत पण जास्त करून अमराठी मालकांची. इतर भाषांच्या मानाने मराठी चि‍त्रपट कमी निघतात व त्यांना मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा तितका नसतो. या सर्व माध्यमांचे मराठी भाषेला काय योगदान आहे, हे अभ्यासायला हवे.

महाराष्ट्रात शासकीय व गैरशासकीय स्तरांवर मराठीचा वापर किती होत आहे याचे काही मोजमाप योजून, त्याचे एकूण मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीवर काय परिणाम होत आहेत हे बघायला हवे.

मराठी भाषा व मराठी माणूस यांना केन्द्रीभूत धरून या समाजाच्या घटकांची समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, राजकीय, शैक्षणिक इ. दृष्ट्रीकोनातून स्वतंत्र वेगवेगळ्या पातळींवर शास्त्रीय पाहणी करून त्यांचे संशोधनात्मक निष्कर्ष काय निघतात ते पाहणे मोठे उदबोधक ठरेल हे निश्चित. अशा निष्कर्षांवरून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने व्हायला हवी हे स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी हे काम हाती घ्यायला हरकत नाही.

मराठी भाषा व भाषिकांच्या समस्या महाराष्ट्रापुरत्या वेगळ्या, तर महाराष्ट्राबाहेर भारतात म्हणजे बृहन्महाराष्ट्रात वेगळ्या, तसेच भारताबाहेर परदेशात आणखीन वेगळ्या आहेत. मराठी भाषा व संस्कृतीची पाळेमुळे महाराष्ट्रात असल्यामुळे तेथे खतपाणी जितके जास्त मिळेल तितकी त्याची फळे सुमधुर चाखायला मिळतील. राज्यकर्ते मराठी असल्याने या बाबतीतले नीतीनियम हवे तसे योग्य तर्‍हेने ठरविणे कठीण नाही.

बृहन्महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा तर इतर प्रांतात मराठी व मराठीपण टिकविण्यासाठी हजाराहून अधिक संस्था धडपडत आहेत. त्यांची माहिती ''बृहन्महाराष्ट्र परिचय सूची'' या पुस्तकात अलिकडेच प्रसिध्द झाली आहे. बृहन्महाराष्ट्रात मराठी शिक्षणाच्या संस्था हळूहळू कमी होत आहेत. संस्थाचालक मराठी असले तरी मराठी शिक्षणाची तेथील लोकांना गरज वाटत नाही. त्यामुळे मराठीसाठी विद्यार्थी नाहीत अशी अवस्था आहे. इतर 'महाराष्ट्र मंडळ' किंवा 'समाज' नावाच्या संस्था आहेत. त्या आर्थिक दृष्ट्या तितक्या सबळ नाहीत. (अपवाद सोडून). तेव्हा महाराष्ट्र शासनाने व तेथील जनसामान्यांनी आपल्या बृहन्महाराष्ट्रातील बांधवांसाठी जाणीवपूर्वक आर्थिक पदतीचा हात पुढे करणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर दूरवर अनेक ठिकाणी त्यांच्यातले मराठीपण सरून पंत, खेर यांच्यासारखी आडनावेच तेवढी शिल्लक राहतील. याबाबतीत महाराष्ट्राचा दूरदर्शीपणा कमी पडू नये.

भारताबाहेरचा मराठी समाज हा मुख्यत: धनिक वर्ग आहे. त्यामुळे मराठीच्या संवर्धनार्थ कार्य करणे त्यांना सुलभ जाते. सर्व क्षेत्रातील मराठी श्रेष्ठ दिग्गज व्यक्तींना महाराष्ट्रातून आमंत्रित करून मराठीचा संपर्क कायम ठेवणे तेथे पैशाच्या पाठबळावर सोपे काम आहे. मराठीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ते भरपूर उपयोग करीत असतात. तिकडील मराठी संस्था व त्यांचे कार्यकर्ते मराठीच्या संवर्धनार्थ नेहमी प्रयत्नशील असतात. हे उल्लेखनीय व अभिनंदनीय आहे.

मराठी, भाषा, साहित्य, संस्कृती यांत इतरांना देण्यासारखे खरंच काही नाही का, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असेल तर ते नेमके काय आहे? असे देणे इतरांना आमच्या हातून दिले गेले नाही की इतरांनी ते जाणीवपूर्वक स्वत:च्या अभिमानाखातर टाळले, की आमची लेणी त्यांना क्षुल्लक वाटली?

खरे तर सध्याचे जग हे स्पर्धेचे जग आहे. त्यात निरनिराळ्या भाषांची वर्चस्वासाठी स्पर्धा टाळता येणार नाही. मराठीपुरते बोलायचे तर मराठीने आपली खिडक्यादारे दुसर्‍यांना आत शिरण्यासाठी सदैव खुली ठेवली. आपण त्यांची भाषा शिकलो ते त्यांच्या भाषेतील साहित्य आमच्या भाषेत आणण्यासाठी. हा उदारपणा एकतर्फी असता कामा नये हे भान मात्र आम्ही ठेवले नाही. महाराष्ट्राजवळ व मराठी साहित्यात असलेला अमोल ठेवा इतर भाषिकांनी घ्यावा यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न झाले असले तर ते नगण्यच.

तेव्हा, मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीची ओळख इतर भाषिकांना व्हावी यासाठी चिकाटीने विशेष प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र निधी व विश्वस्तांची योजना आखायला हवी. सुरूवातीस शंभर उत्कृष्ठ मौल्यवान मराठी ग्रंथांची निवड करून त्यांचे रूपांतर, भाषांतर निदान बंगाली, उडीया, तेलगु, तामीळ, कानडी, मल्याळम, गुजराथी, असमी, हिंदी भाषांमध्ये करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. तसेच या भाषांमधून स्वतंत्र मासिक अथवा द्वैमासिक काढून त्यातून मराठीतील निवडक ललित व इतर साहित्याचे अनुवाद प्रसिध्द करायला हवे. अनुवादकांची साखळी निर्माण करून यासाठी लागणारा खर्च व विक्री यंत्रणा उभी करायला हवी.

निरनिराळ्या प्रांतातील मराठी भाषिक संस्थांनी या उपक्रमास हातभार लावायला हवा. आम्ही आता एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. संपर्क साधने, दूरदर्शन, संगणक, फॅक्स, इ-मेल इ. सुविधा प्राप्त झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे सर्व जग एकमेकापासून हाकेच्या अंतरावर आले आहे. या साधनांचा उपयोग मराठी भाषेच्या प्रचार प्रसारार्थ करायला हवा. दूरचित्रवाणीवर आता काही मराठी वाहिनी उपलब्ध झाल्याने मराठी कार्यक्रम बघण्याची सोय झाली आहे. परंतु मराठी वाहिनी किंवा रेडिओचे मराठी कार्यक्रम ज्या प्रमाणात संपूर्ण देशभर जायला पाहिजेत त्या प्रमाणात जात नाहीत ही दूरवरची खंत आहे. वाहिनी वितरक व केबलवाल्यांच्या मर्जीवर बर्‍याच जणांना अवलंबून राहवे लागते. यातून काही मार्ग काढायला हवा. ध्वनीफीतींद्वारे मराठी संगीत घरोघरी ऐकण्यास खूपच मदत झाली. पुढील पिढ्यापर्यंत मराठी मातृभाषेचे प्रेम टिकून राहावे व वृध्दिंगत व्हावे यासाठी आजच्या पिढीने दूरदृष्टीने ही वाटचाल मार्गी लावणे फार आवश्यक आहे.

मराठी भाषेचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जागतिक परिषद, साहित्य संमेलने, बृहन्महाराष्ट्र मंडळ इ. सारख्या मराठीसाठी झटणार्‍या देशपरदेशातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केल्यास समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 'मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उपदेशाचे पालन करून मायमराठीचे ऋण फेडल्यासारखे होईल. जय मराठी!

( महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या 'मालविका' या स्मरणिकेतून साभार)
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments