महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंतांनी गायिली आहे. तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेलें, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापटांनी दिली आहे.
मराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील, अशी केवळ अपेक्षाच नव्हे, तर खात्री मराठी जनतेला वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलियन यांनी शब्दबद्ध केले होते. मराठी भाषा मृत होऊ लागली आहे. मरू घातली आहे, असे अनेक शहाणेसुरते उघड-उघड बोलू लागले.
अरे, गीतोपदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभिषेक करणार्या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल? संतांनी लोकगीतांपासून, ब्रह्मपदाचा मार्ग सांगणार्या विचारगर्भ अध्यात्मापर्यंत या मराठी भाषेचा मुक्त संचार सर्वत्र घडविला. ही कधी पायात सुवर्णशब्दांचे नादमधुर पैंजण बांधून लोकरंजनासाठी नाचली, तर कधी डफ-तुणतुण्यांच्या साथीने वीराचे बाहू स्फुरण पावण्यासाठी शाहिरांच्या वीररसात न्हाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेतच आपले लोककल्याणाचे आदेश दर्याखोर्यांत आणि खेड्यापाड्यात पोहोचविले. मराठी भाषेने सप्तसुरांच्या नादात आणि नवरसांच्या रंगांत इथल्या रंगभूमीवर असे काही, वैभव संपादन करून ठेवले की, भारतातल्याच नव्हे, जगातील भाषांना मराठीचा हेवा वाटावा.
फार कशाला, या महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकाराने सेवा तर केलीच, पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीय होता. गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली तो विद्वान या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नरकेसरी लोकमान्य या मराठी भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले-आंबेडकर या महाराष्ट्रातच निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसेतुहिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरुपाची ठरली ते पलुस्कर, भातखंडे इथलेच. अहो, बोलपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके काय किंवा पहिले मराठी चित्रपटातील राष्ट्रपती पदक मिळविण्याचा पराक्रम करणारे आचार्य अत्रे काय, मराठी मातीचेच सुपुत्र. देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधु सारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे. किती नावे सांगावीत? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्या हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठीतच नव्हे, तर इंग्रजी, गुजरातीपासून हिब्रूपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे आद्य मुद्रक महर्षि जावजी दादाजी हे महाराष्ट्राचेच.
कालमापनाच्या क्षेत्रात भारतीयांची कामगिरी विश्वभाषेतून मांडतांना एका इंग्रजसाहेबाला साहाय्य घ्यावे लागले ते मराठीभाषिक शं. बा. दीक्षित यांचेच. मराठी भाषिक कर्तृत्वाची ही केवळ एक झलक.
इतक्या थोरांनी गौरविलेली भाषा मृत होणार असे आपण कसे म्हणे शकू ? मराठी भिकारीण झाली, तरीही कुशीचा तिच्या तीस केवि त्यजी या शब्दांत मराठीचे पुत्र मराठीला अंतर देणार नाहीत, अशी आत्मविश्वासपूर्ण भविष्यवाणी माधव ज्यूलियन यांनी कित्येक वर्षांपूर्वी वर्तविली होती. ती सार्थ आणि यथार्थ ठरेल, अशी अपेक्षा आपण यंदाच्या महाराष्ट्र दिनी बाळगूया.
साभार : महान्यूज