शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (21:06 IST)

HARI OM - नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणार 'हरीओम'

hari om
भगवे वादळ निर्माण करणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची कथा सांगणारा आशिष नेवाळकर, मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरीओम' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून आपला मराठीबाणा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जपणारा हा 'हरिओम' येत्या14 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानणारे हे आधुनिक युगातील मावळे अन्यायाविरोधात, खोटेपणा, कायदा, सत्तेच्या गैरवापराविरोधात संघर्ष करताना दिसत आहेत.  शिवप्रेम, बंधुप्रेम, आक्रमकता असणाऱ्या 'हरी- ओम'मध्ये ध्येय गाठण्याची जिद्द दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्ट्य ते गाठणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट दिसत असला तरी यात हळुवार खुलत जाणारी प्रेमकहाणीही यात पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवणारा 'हरीओम' हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. निरंजन पेडगावकर, प्रशांत, अमोल कोरडे, गणेश, राहुल यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्दबद्ध केले असून या श्रवणीय गाण्यांना निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिले आहे. तर या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘हरिओम’च्या क्रिएटिव्ह  डायरेक्टरची धुरा राज सुरवडे यांनी सांभाळली आहे.
 
चित्रपटाचे निर्माता, कथाकार आणि अभिनेता हरिओम घाडगे म्हणतात, '' शिवरायांची तत्त्वं पाळणारा मी एक शिवप्रेमी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांची तत्त्वे तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक भावनेने मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा.''