शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 7 मार्च 2023 (10:09 IST)

PHAKAAT - 12 मे रोजी होणार फकाटचा हायली कॉन्फिडेन्शिअल ॲक्शन कॅामेडी धिंगाणा

phakaat movie
मराठी सिनेसृष्टीला 'बघतोस काय मुजरा कर', 'बस स्टॉप', 'बाबू बॅन्ड बाजा', 'ऑनलाईन बिनलाईन',' मी पण सचिन' यांसारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. यापूर्वी श्रेयश जाधव यांनी 'मी पण सचिन'चे लेखन, दिग्दर्शन केले होते. आता आणखी एका नवीन चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. 'फकाट' असे आगळेवेगळे नाव असणारा हा चित्रपट येत्या 12 मे रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेल्या या चित्रपटात हेमंत ढोमे, अविनाश नारकर, सुयोग गोऱ्हे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट, गणराज स्टुडिओ प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाच्या निता जाधव निर्मात्या आहेत.
 
पोस्टरवर हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांच्या दोघांच्या मध्ये अविनाश नारकर एक पाकीट घेऊन उभे आहेत. या पाकिटावर कॉन्फिडेन्शिअल असे लिहिले आहे. आता या पाकिटात काय गुपित दडले आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल.
 
दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, '' पुन्हा एकदा एक धमाल चित्रपट घेऊन मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा ॲक्शन कॅामेडी चित्रपट असून सध्यातरी यातील अनेक गोष्टी कॉन्फिडेन्शिअल आहेत. येतील हळूहळू समोर. हा एक कौटुंबिक सिनेमा असून 'फकाट' प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.''