'ग सहाजणी' त पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर यांची दे धमाल
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ग सहाजणी' या विनोदी मालिकेत सध्या दे धमाल घटना घडत आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकत्याच दिवाळी सणानिमित्त झालेल्या ग्रँड महाबोनस सेलिब्रेशन नंतर मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेतल्या एका थरारक घटनेत पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर हे लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना वेगळ्या रुपात दिसणार आहेत.
दिवाळी सणाच्या उत्साहात संपूर्ण एमयुपी बॅंक असताना तीन संशयित आरोपी दरोड्याच्या हेतूने बॅंकेत घुसतात. याच दरम्यान पोलीसही तिथे येतात. मग त्यानंतर चोर आणि पोलीसांचे थरारनाट्य सुरु होते. या थरारनाट्यात पोलीस दरोडेखोऱ्यांना पकडण्यात यशस्वी होतात का? मालिकेतील सहाजणी या प्रसंगाला कश्या सामोऱ्या जातात, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
या भागात सहाजणी नेमक्या कोणाला पकडतात, नेहमीच काहीतरी गोंधळ करत बॅंकेत समस्या निर्माण करणाऱ्या या सहा मैत्रिणीमुळे नेमका कोणाला फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चोर-पोलिसांचा हा मजेशीर भाग ६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येणार असून यात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, गणेश रेवंडेकर आणि चंदू बारशिंगे हे लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवायला येणार आहेत.