शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 11 जुलै 2022 (13:49 IST)

'प्लॅनेट मराठी'वर लवकरच... 'मी पुन्हा येईन '!

mi parat yein
लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' नावाची वेबसीरिज येणार आहे. अरविंद जगताप यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  
 
 टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे. 
 

'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल"
 
'मी पुन्हा येईन' लवकरच प्लॅनेट मराठी या ऍपवर पाहायला मिळणार आहे, नुकतंच या सीरीजचा टीझर लाँच करण्यात आलाय.