शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2020 (15:29 IST)

‘समांतर’ मधून स्वप्नील जोशी आणि सतीश राजवाडे यांचे वेब सिरीजमध्ये पदार्पण

कायमच आपले वेगळेपण जपणारा अभिनेता स्वप्नील जोशी अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेत दिसेल. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने केली असून पहिल्यांदाच वेब सिरीज सेगमेंटकरिता भागीदारी करण्यात आली. ही वेबसिरीज ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.
 
स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीत यांच्या मुख्य भूमिका या सिरीजमध्ये असणार आहेत. दोन्ही कलाकारांकरिता ही अशाप्रकारची पहिली वेब सिरीज आहे. ही मालिका सुहास शिरवळकर यांच्या समान नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. सध्या ही वेब सिरीज “एमएक्स प्लेयर” या क्षेत्रातील अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध आहे.
 
‘समांतर’ ही वेब सिरीज ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेनमेंट अँड मीडिया सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांची निर्मिती असून अनेक भाषांमध्ये यशस्वी सिनेमे देणाऱ्या या कंपनीची ‘समांतर’ ही पहिलीच वेब प्रकारातील कलाकृती ठरली आहे. मोगरा फुलला, फुगे, तुला कळणार नाही, रणांगण, विकी वेलिंगकर अशा सिनेमांची निर्मिती आजवर या कंपनीने केली. मनोरंजन क्षेत्रात सर्जनशील विषय हाताळणारे निर्माता म्हणून स्वत:चे नाव सिद्ध करणारा ‘जीसिम्स’ महाराष्ट्रातील अग्रेसर स्टुडीओ आहे. मनोरंजन उद्योगातील निर्मिती, सिने सादरीकरण, टीव्ही मालिका निर्मिती, सिनेमा विपणन आणि प्रचार तसेच सॅटेलाईट अॅग्रीगेशन असे अनेक प्रांत कंपनी हाताळते.   
 
“साहित्यावर प्रेम करणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी निर्माण केलेली ही आमची पहिलीच वेब सिरीज आहे. मराठीमधील अशा प्रकारच्या पहिल्याच मालिकेत क्षेत्रातील दिग्गज अभिनेते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ही सिरीज ओटीटी मंचावर यशस्वी होईल याविषयी आम्हाला ठाम विश्वास वाटतो. अशा अनेक विषयांवर आधारित सिरीजची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे,” असे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणाले.
 
स्वप्नील जोशी म्हणाला की, “वेब सिरीजमध्ये पहिले पाऊल टाकताना कथानकाची निवड माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. समांतर ही मला आवडणाऱ्या कादंबऱ्यांपैकी एक असून तिचे लिखाण सुहास शिरवळकर यांनी केले आहे. काही वर्षापूर्वी शिरवळकर यांच्या साहित्यावर आधारित दुनियादारी’मध्ये माझी प्रमुख भूमिका होती. ते माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. ते धाडसी लेखक आहेत. समांतर एक अत्यंत चांगली दृश्य कलाकृती ठरणार आहे. मी समांतरचा भाग असल्याचा तसेच मला शिरवळकर यांच्या नावासोबत जोडण्याची संधी लाभली म्हणून आनंद वाटतो. दुनियादारीनंतरची ही दुसरी संधी आहे. मी श्रीमती शिरवळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे आभार मानतो की, त्यांनी आम्हाला- मला, सतीश राजवाडे आणि ‘जीसिम्स’ला हा प्रकल्प करण्याची संधी दिली. त्यांनी मोठ्या विश्वासाने आमच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली.”. 
 
स्वप्नील पुढे म्हणाला की, “सतीश या पुस्तकाने भारावला, या प्रकल्पासाठी तोच एक सशक्त दिग्दर्शक आहे. मी आणि सतीश आणखी एका प्रकल्पावर एकत्र काम करत आहोत. या अद्वितीय कथेवर वेब सिरीजची निर्मिती करण्यात ‘जीसिम्स’ने मोलाची भूमिका बजावली. अतिशय दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञानी मोठी मेहनत घेतली आहे. मी यामध्ये कुमार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी आजवर बजावलेल्या भूमिकांहून ही व्यक्तिरेखा निराळी ठरेल. एक अभिनेता म्हणून हे माझ्यासाठी आव्हान होते. प्रेक्षकांना ही वेब सिरीज नक्कीच आवडेल. ही वेब सिरीज एमएक्स प्लेयरवर येणार असून ही या क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. हा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल याविषयी मला खात्री वाटते.”