सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (14:55 IST)

नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास दाखवणाऱ्या 'गडकरी'चा टिझर प्रदर्शित

nitin gadkari movie
ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून अक्षय अनंत देशमुख निर्मित, अनुराग राजन भुसारी, मिहिर फाटे सहनिर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांचे आहे. नितीन गडकरी या नावाला भारतात जितका सन्मान आहे तितकेच हे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदरणीय आहे. अशा व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आऊट झाले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता टीझरमध्येही कायम राहिली आहे. 
 
नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. टीझरची सुरुवातच ''या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी...'' या ओळीने होतेय. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टिझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे. 
 
दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, '' नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शनानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचे विचारले. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांचे हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे 'गडकरी'मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल.''