गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:11 IST)

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; ग्रीन-वेड चमकले

कॅमेरुन ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांच्या झंझावाती खेळींच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी20 लढतीत 4 विकेट्सनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर के.एल.राहुलने 55 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 46 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
 
या पायावर हार्दिक पंड्याने 30 चेंडूत 71 धावांची वेगवान खेळी करत कळस चढवला. त्याने 7 चौकार आणि 5 षटकारांसह ही खेळी सजवली. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन एलिसने 3 तर जोश हेझलवूडने 2 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना 145/5 अशी स्थिती होती. मात्र यानंतर मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिडने जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
कॅमेरुन ग्रीनने 30 चेंडूत 61 धावांची खेळी केली. वेडने 21 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली. टीमने 14 चेंडूत 18 धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे अक्षर पटेलने 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या मात्र त्याला बाकी गोलंदाजांची साथ मिळू शकली नाही.
 
61 धावा, एक विकेट आणि 2 झेलांसाठी ग्रीनला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच 23 सप्टेंबरला नागपूर इथे होणार आहे.